राज्यात टोलच्या विरोधात टोलनाके फोडण्याचे आंदोलन करणाऱ्या मनसेकडून कायद्यानुसार नुकसान भरपाई वसूल केली जाईल, असे गृहमंत्री पाटील यांनी सोमवारी सांगितले. भरपाई देण्यास नकार दिल्यास पक्ष प्रमुख म्हणून प्रसंगी राज ठाकरे यांची मालमत्ता जप्त करण्याचीही कारवाई होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला. टोल वसुलीच्या विरोधात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्याच आठवडय़ात उग्र आंदोलन करण्यात आले. त्यावेळी काही टोलनाक्यांची तोडफोड करण्यात आली. त्याबद्दल नुकसान भरपाई देणार नाही, सरकारला काय करायचे ते करावे, असे खुले आव्हानच राज यांनी दिले आहे. त्याबद्दल पाटील यांना विचारले असता, आंदोलनातील मालमत्तेच्या नुकसानीबद्दल संबंधित संघटना, राजकीय पक्ष, कार्यकर्ते व नेत्यांकडून भरपाई वसूल करण्याची तरतूद असलेला कायदा राज्य सरकारने केला आहे, त्यानुसार मनसेकडून भरपाई वसूल केली जाईल, असे ते म्हणाले.
मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे यांच्या चिथावणीमुळे टोलफोड आंदोलन झाले आहे का, याचीही तपासणी केली जाईल. तसे असेल तर कायद्यानुसार राज यांच्याकडूनही भरपाई सक्तीने वसूल केली जाऊ शकते. अशा प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना सक्तीने नुकसान भरपाई वसूल करण्याचा वा संबंधित नेत्याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर िहसक आंदोलनाबद्दल निवडणूक आयोगाकडेही तक्रार करता येते. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित पक्षावर आयोगाकडूनही कारवाई केली जाते, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा