जकात चुकवून मुंबईत आलेले ट्रक पकडल्यानंतर घराकडे परतत असताना मुंबई महापालिका विधी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मकरंद नार्वेकर यांच्या गाडीला गुरुवारी सकाळी एका ट्रकने धडक दिली. हा आपल्या हत्येचाच प्रयत्न होता, असा आरोप नार्वेकर यांनी केला आहे.
अ‍ॅड. नार्वेकर गुरुवारी सकाळी ६ वाजता दहिसर जकात नाक्यावरून परतत असताना सातच्या सुमारास दादरच्या चित्रा चित्रपटगृहाजवळ त्यांना १९ ट्रक आणि एक टेम्पो दृष्टीस पडले. त्यांनी हा ताफा रोखला आणि कागदपत्रांची तपासणी केली असता जकात चुकवून या गाडय़ा मुंबईत आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अ‍ॅड. नार्वेकर आपल्या गाडीत बसून निघाले. तेवढय़ात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली.
यापूर्वी जकात माफियांनी मला पालिका मुख्यालयात येऊन धमकावले होते. त्याबाबत मी पालिका आयुक्तांकडे तक्रारही केली होती. त्यावेळीच कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती, असे त्यांनी सांगितले. जकात चुकविणाऱ्याला एकूण मालावरील जकातीच्या ११ टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केला जातो. मात्र पालिकेच्या दक्षता पथकाने एका प्रकरणात जकात चुकवेगिरी करणाऱ्याकडून केवळ ५ टक्के दंड वसूल केला. याबाबत त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

आयुक्तच बेफिकिर?
जकात नाक्यांवरील वजन काटे नादुरुस्त आहेत, सीसी टीव्ही कॅमेरेही बंद पडले आहेत. आयुक्तांच्या घराचे चार वेळा नूतनीकरण झाले. पण जकात नाक्यांवरील सीसी टीव्ही कॅमेरे मात्र दुरुस्त करायला प्रशासनाला वेळ नाही, असा आरोप नार्वेकर यांनी केला.