मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी आज, शनिवारपासून (२७ ऑगस्ट) होणार आहे. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला. यंदा कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. एसटी गाडय़ा पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. रेल्वेची तिकीटेही मिळणे कठीण असल्याने कोकणात जाणाऱ्या खासगी वाहनांची संख्या मोठी असेल. त्या सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मात्र टोलमाफीसाठी वाहनधारकांना पास घेणे अनिवार्य आहे. मुख्यमंत्र्यांनी २१ जुलैला बैठक घेऊन टोलमाफीच्या सूचना संबधित विभागाला दिल्या होत्या.
एसटीचाही फायदा
टोलमाफीचा फायदा एसटी महामंडळालाही होणार आहे. एसटीच्या नियमित गाडय़ांबरोबरच तीन हजारपेक्षा जास्त जादा गाडय़ाचे यंदा आरक्षण झाले आहे. तसेच मागणी वाढल्यास आणखी एसटी सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने ठेवली आहे.
कोणत्या मार्गावर?
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवरून कोकणात जाणाऱ्या वाहनांना २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत टोल भरावा लागणार नाही.
परतीसाठीही..
‘गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन’ असा मजकूर मुद्रीत केलेले पथकर माफी पास दिले जाणार आहेत. त्यावर वाहन क्रमांक आणि चालकाच्या नावाचा उल्लेख असेल. हे पास पोलीस ठाणे, पोलीस चौक्या आणि आरटीमध्ये उपलब्ध होणार आहेत. पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरण्यात येणार आहेत.