गोमांस बंदीविषयी काही बोललो तर मला नोकरी गमवावी लागेल, असे विधान देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी केले आहे. त्यांनी मंगळवारी मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गोमांस बंदीचा शेतकऱ्यांच्या उत्त्पनावर किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल का, असा प्रश्न एका विद्यार्थ्याकडून यावेळी त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सुब्रमण्यम म्हणाले की, या प्रश्नाचे उत्तर दिल्यास मला माझी नोकरी गमवावी लागेल, हे तुम्ही जाणून आहात. तरीही प्रश्न विचारल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक धन्यवाद, असे सुब्रमण्यम यांनी म्हटले. त्यांच्या या उत्तराला विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. मध्यंतरी सुब्रमण्यम यांनी एके ठिकाणी बोलताना सामाजिक विभागणी विकास प्रक्रियेला खीळ घालणारी असल्याचे सूचक विधान केले होते.
दरम्यान, गोमांस बंदीविषयीच्या त्यांच्या या सूचक मौनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांच्या मंत्र्यांवर असणारा वचक सर्वश्रूत आहे. मात्र, प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारीही त्यांना दबकून असल्याची चर्चा आता रंगली आहे.

Story img Loader