राज्यात स्वाइन फ्लूच्या साथीमुळे घबराट पसरली आहे. राज्यभरात १७८९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यांतील १५२ रुग्ण दगावल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी  दिली. या साथीचा मुकाबला करण्यासाठी खासगी रुग्णलयांमध्ये उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे.
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात बैठक घेऊन स्वाइन फ्लूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनुसार रुग्णांची संख्या लक्षात घेता, खासगी रुग्णालयांनाही या आजारावर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दारिद्रय़रेषेखालील रुग्णांचा विशेषत व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. व्हेंटिलेटरचा खर्च जास्त असतो, म्हणून गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
‘टॅमी फ्लू गोळ्या घ्या’
सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी ही सर्वसाधरणपणे स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. या पैकी कशाचाही त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा. साधारण औषधांनी एक दिवसात ताप, सर्दी, खोकला बरा झाला नाही, तर तपासणी न करता दुसऱ्या दिवसापासून डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमी फ्लू ही स्वाइन फ्लू आजारवरील ही गोळी घ्यायला सुरुवात करा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.