पात्रता निकष गुंडाळून नवी मुंबईतील एका निवासी इमारतीत चालविल्या जाणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या वाणिज्य महाविद्यालयाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय अखेर मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. हे महाविद्यालय ज्या संस्थेमार्फत चालविले जाते त्या ‘मत्स्योदरी शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष खुद्द राजेश टोपे आहेत. तर संस्थेच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून टोपे कुटुंबीयांचा भरणा आहे. नवी मुंबईतील ‘सिलिकॉन’नामक एका निवासी इमारतीत चालविल्या जाणाऱ्या या महाविद्यालयात अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे. स्टाफरूम, सभागृह, मुलींसाठी स्वतंत्र रूम, जिमखाना आदीची सोय नसलेल्या या महाविद्यालयाला विद्यापीठाने आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता तरी कशी दिली असा प्रश्न आहे. ‘लोकसत्ता’ने एका वृत्ताद्वारे या बाबींवर प्रकाश टाकला होता.
‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना’ (मनविसे) या विद्यार्थी संघटनेसह सिनेट सदस्य, व्यवस्थापन समितीचे सदस्य आदींकडून दबाव आल्यामुळे विद्यापीठाने त्रिसदस्यीय समितीकडून या महाविद्यालयाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टोपे यांच्या महाविद्यालयाला भेट देऊन ही समिती पात्रता निकषांची पूर्तता केली आहे की नाही याची पाहणी करेल. त्यानंतर महाविद्यालयाची संलग्नता कायम ठेवावी का याचा निर्णय घेईल.   

Story img Loader