Torres Scam in Mumbai: मुंबईतील ‘टोरेस’च्या सर्व शाखा सोमवारी अचानकच बंद झाल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. दागिने विक्रीबरोबरच गुंतवणुकीचाही व्यवसाय करणाऱ्या या कंपनीकडून ग्राहकांना गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आमिषं दाखवण्यात आली होती. त्यातलंच एक आमिष म्हणजे गुंतवणुकीवर आठवड्याला ११ टक्के व्याज परतावा मिळणार. पण सोमवारी अचानक कंपनीच्या सगळ्याच शाखा बंद दिसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली.
“योजनेमुळे जिवलग मित्र गमावले”
“शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक केल्यानंतर मिळालेल्या परतव्यातून टोरेस कंपनीत गुंतवणूक केली. सुरुवातीला चांगला नफा मिळाल्यानंतर मित्रांनाही यात गुंतवणूक करण्यास सांगितले. माझ्यामुळे त्यांची फसवणूक झाल्यामुळे अपराधीपणाची जाणीव होत आहे. यामुळे जिवलग मित्र गमावण्याची वेळ आली आहे”, अशा शब्दांत गुंतवणूकदार मेहुल चौधरी यांनी आपली व्यथा मांडली आहे.
“मी या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले आहेत. पण आता दुकान बंद आहे. नेमकं काय झालंय ते माहिती नाही. पण आम्हाला आमचे पैसे परत हवेत. त्यांनी आधी सांगितलं की पैशांच्या बदल्यात एक स्टोन दिला जाईल. त्यानंतर त्यांनी सांगितलं की जेवढे पैसे गुंतवले त्यावर व्याजापोटी आठवड्याला ११ टक्के पैसे दिले जातील. आज माझा पहिला हप्ता येणार होता”, अशी तक्रार ज्ञानेश्वर बोडके नावाच्या गुंतवणूकदारांनी मांडली.
नेमकं प्रकरण काय?
‘टोरेस’ नावाच्या सोने, चांदी, हिरे यांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीने ३ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत कार्यालय सुरू केलं. गुंतवणुकीचाही व्यवसाय सुरू केला. दागिन्यांची विक्री केल्यास गुंतवणुकीवर ४ टक्के व्याज देण्याचं कबूल केलं. नंतर ही रक्कम वाढवून ६ टक्के केली. काही दिवसांपूर्वीच ११ टक्के व्याज परतावा देण्याचं कंपनीनं जाहीर केलं. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवण्यात आला. सुरुवातीच्या काळात सांगितल्याप्रमाणे व्याज परतावा दिला. पण सोमवारी अचाकन सर्वच कार्यालयं बंद असल्यामुळे ग्राहकांमध्ये घबराट पसरली. काही कार्यालयांबाहेर ग्राहकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मोडतोडीचेही काही प्रकार घडले. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त तैनात केला.
गुन्हे दाखल
दरम्यान पोलिसांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सर्व्हेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा आणि व्हॅलेंटिना कुमार अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीने आतापर्यंत अनेकांना नफा मिळवून दिला. उच्चभ्रू परिसरातील इमारतीत घरे, गाड्या, दागिने असा आकर्षक परतावा देऊन कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढली. सहा लाखांपेक्षा अधिक रक्कमेवर ११ टक्के आणि त्यापेक्षा कमी रक्कमेवर चार टक्के परतावा दिला जात असे. त्यामुळे अनेकांनी कंपनीत करोडो रुपये गुंतविले. कंपनीने अन्य ७ देशांमध्येही फसवणुकीचे असेच प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे.