लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : टोरेस गैरव्यवहारात अटक करण्यात आलेला हवाला ऑपरेटर अल्पेश प्रवीणचंद खाराने टोरेस गैरव्यवहारातील गुंतवणूकदारांच्या रकमेतून दक्षिण मुंबईत तीन सदनिका खरेदी करण्यासाठी आगाऊ रक्कम भरल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात आतापर्यंत १४ हजार १५७ गुंतवणूकदारांची एकूण १४२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात आलेल्या या गैरव्यवहारामागे परदेशी नागरिकांचा मुख्य सहभाग आहे.
याप्रकरणातील अटक आरोपी खाराने अर्थ दर्शन इमारतीच्या २४ व्या मजल्यावरील तीन सदनिकांसाठी बांधकाम व्यवसायिकाला सव्वा कोटी रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिले होते. ही रक्कम २६ नोव्हेंबर २०२४ आणि ७ जानेवारी २०२५ दरम्यान बांधकाम व्यावायिकाच्या खात्यात जमा करण्यात आली. मात्र, पूर्ण २ कोटी रुपये भरण्यात अपयश आल्यामुळे सदनिकेची नोंदणी होऊ शकली नाही, अशी माहिती बांधकाम व्यावसाायिकाने पोलिसांना दिली.
हवाला आणि कूट चलनाचा गैरवापर
टोरेस गैरव्यवहारातील आरोपी नागरिकांकडून रोख रक्कम गोळा करून ती हवाला ऑपरेटर खाराकडे देत होते. त्यांतर तो यूएसडीटी या कूट चलनाच्या माध्यमातून परदेशात रक्कम पाठवत होता. आरोपपत्रानुसार काही रक्कम खारा व त्याच्या पत्नीच्या मालकिच्या सराफ दुकानाच्या बँक खात्यावरही जमा झाली आहे. त्यानंतर ती रक्कम खाराची पत्नी व मुलाच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आली. त्या रकमेद्वारे गिरगावमधील खेतवाडी येथे तीन सदनिकांची नोंदणी करण्यात आली.
हिऱ्यांची खरेदी
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात खारा हा प्रत्यक्षात टोरेस ब्रँडसाठी काम करीत होता आणि त्याने टोरेससाठी ४१ लाख रुपयांचे हिरे खरेदी केले होते. हे हिरे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येत होते. आरोपीने मोबाइलमधील काही डेटा डिलिट केला आहे. तो पुन्हा मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिकची मदत घेतली जात आहे. त्यात अटक आरोपी आणि फरार असलेल्या परदेशी आरोपींशी संपर्क साधल्याचे आणखी पुरावे असण्याची शक्यता आहे.
परदेशी नागरिकांसह ११ आरोपी फरार
या प्रकरणात ८ युक्रेनियन नागरिक आणि १ तुर्की नागरिकासह एकूण ११ आरोपी अद्याप फरार आहेत. मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, इंटरपोलने परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. संशयित सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि इयुर्चेंको यांच्या विरोधात पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ३१७ (२), ३१७ (४), ३१७ (५), ३१५ (५) व महाराष्ट्र महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण (एमपीआयडी) कायदा ३ व ४ कलम, तसेच अविनियमीत ठेव योजना बंदी कायदा कलम २१ व २३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलंड, दुबई व बँकॉकमार्गे पलायन
नऊ आरोपींनी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी हवाईमार्गे पोलंड, दुबई आणि बँकॉकला पलायन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सध्या ते बल्गेरियामध्ये असल्याचा संशय आहे. त्याची पडताळणी सुरू आहे. या आरोपींविरोधात इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पोलीस अजामीनपात्र वॉरंट मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या प्रक्रियेद्वारे परदेशात आरोपींना अटक करणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले.