मुंबई : टोरेस गैरव्यवहारप्रकरणी आतापर्यंत ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्याशिवास टोरेस कंपनीशी संबंधित छोट्यामोठ्या वस्तू, सात-आठ मोटारगाड्या व महागडे खडे जप्त करण्याची परवानगी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे मागितली आहे. याशिवाय याप्रकरणी सक्षम अधिकारी नियुक्ती करण्याबाबतही प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यांत सर्व प्रक्रिया संपवून तक्रारदारांना रक्कम परत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
टोरेस प्रकरणात आतापर्यंत ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच टोरेस कंपनीशी संबंधित फर्निचर, विद्युत वस्तू, सात ते आठ मोटरगाड्या व दीड कोटी रुपयांचे मौल्यवान खडे यांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली आहे. ते जप्त करण्याबाबत एमपीआयडी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. त्याशिवाय याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम अधिकारी म्हणून नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठीही परवानगी मागण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १२ हजार ७८३ गुंतवणूकदारांची १३० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी परदेशातही अशाच प्रकारे कंपनी स्थापन केली असून तेथेही गुंतवणूक योजना राबवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे या प्रकरणात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. हा संपूर्ण कट युक्रेन देशातील नागरिक असलेल्या मुख्य आरोपीने रचला होता. या प्रकरणात आरोपी असलेले युक्रेन देशाचे आठ नागरिक आणि एक तुर्कस्तान देशाचा नागरिक सध्या फरार आहेत. पोलिसांनी संशयित सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि इयुर्चेंको यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. टोरेस प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने गैरव्यवहारातील २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. हा गैरव्यवहार उघड होण्यापूर्वी काही सतर्क नागरिक व गुंतणूकदारांनी पोलीस व इतर यंत्रणांना या प्रकरणाबाबतची ईमेलद्वारे माहिती दिली होती.

१३ ठिकाणी छापे

याप्रकरणी ईडीही तपास करत आहे. त्यांनी याप्रकरणी जयपूर व मुंबईतील १३ ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात संशयित कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. तसेच, मे. प्लाटिनम हेर्न प्रा. लि.(टोरेस ज्वेलरी) आणि त्याच्या सहयोगी संस्थांच्या नावावर असलेल्या असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यात २१ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torres investors likely to get up to rs 40 crore in six months mumbai print news zws