मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस प्रकरणात शनिवारपर्यंत कंपनीच्या विविध शाखांमधून सुमारे ९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच कंपनीकडून बक्षिस स्वरुपात गाडी स्वीकारणाऱ्या १५ गुंतवणूकदारांची ओळख पटविण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
टोरेसप्रकरणी दादरमधील कंपनीच्या शाखेत शोधाशोध राबविण्यात आली. कंपनीने १५ वाहने विकत घेतल्याचे आणि ५ वाहने आरक्षित केल्याचे पुरावे या शोध मोहिमेत सापडले. आरोपींनी दादर येथे टोरेस कंपनीची शाखा सुरू करण्यासाठी प्रती महिना २५ लाख रुपये भाड्याने जागा घेऊन तेथे शो रुम उघडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी जागा मालकाकडे चौकशी करीत आहेत. मालकाने केलेला भाडेकरार, रक्कमेचा व्यवहार आदी तपशीलाची चौकशी केली जात आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने वाहने बक्षीस म्हणून दिल्याचे समजताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ती स्वीकारणाऱ्या गुंतवणुकदारांचा शोध सुरू केला.
हेही वाचा – मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
कंपनीकडून बक्षिस स्वरुपात गाडी स्वीकारणाऱ्या १५ गुंतवणूकदारांची ओळख पटविण्यात आली असून या गाड्या जप्त कराव्याचा आर्थिक गुन्हे शाखा विचार करीत आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी अनेकांनी शनिवारीही तक्रार केली. तसेच गेल्या सोमवारी टोरेसविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दीड हजारांहून अधिक तक्रारदार पुढे आल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सुरू केलेल्या विशेष कक्षात आतापर्यंत २४ कोटी रुपयांच्या फसवणुकीची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यात टोरेस ब्रॅण्ड सुरू करणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माजी संस्थापक, संचालक ओलेना स्टोएना या महिलेस आरोपी करण्यात आले असून ओलेना युक्रेनची नागरिक आहे.