Torres Scam in Mumbai : मुंबईत उघड झालेल्या ‘टोरेस’ कंपनी घोटाळ्यातून आता नवनवे खुलासे समोर येऊ लागले आहेत. ‘टोरेस’ नावाने मुंबई, ठाणे व आसपासच्या भागात शाखा सुरू करून कंपनीनं जवळपास सव्वालाख ग्राहकांची फसणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चौथ्या आरोपीविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या टोरेस कंपनीत एक भाजी विक्रेते प्रदीपकुमार वैश्य यांनी सुमारे १३ कोटी रूपयांची रक्कम गुंतवली होती. तसेच त्यांच्या सांगण्यावरून कुटुंबिय आणि इतर नातेवाईकांनी देखील या कंपनीत पैसे गुंतवल्याचे वैश्य यांनी सांगितले आहे. हा सगळा प्रकार नेमकं कसा घडला याबद्दल या भाजी विक्रेत्याने टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.
भाजी विक्रेता प्रदीपकुमार वैश्य यांनी सांगितलं की, “कंपनीत ३ फेब्रुवारी २०२४ साली सुरू करण्यात आली होती, कंपनीचे भव्य शुभारंभ करण्यात आला होता. सामन्य दुकानाप्रमाणे नव्हते, एखाद्या बड्या कंपनीप्रमाणे याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याच्याकडे पाहून वाटत होतं की कुठलीतरी एक मोठी कंपनी सुरू होत आहे. आजूबाजूचे लोक पाहत होते आणि मी देखील दुकानातून बाहेर गेलो की ढोल वाजताना पाहात होतो. अनेक सेलिब्रेटी आणि इतर लोक त्या दिवशी उद्घाटनाला आले होते. तरीही सुरुवातीला मी त्यात रस घेतला नाही”.
लोकांना परतावा मिळताना पाहून आपण देखील गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे वैश्य म्हणाले, त्यांनी सांगितलं की, “नंतर दोन-तीन जणांनी कंपनीच्या योजनेबद्दल सांगितलं. ज्यामध्ये तुम्ही १० हजार रूपयांची खरेदी केली तर तुम्हाला ४,५,६ टक्के परतावा महिन्याला नाही तर आठवड्याला मिळेल… मी असं शक्य नसल्याचे म्हणालो. पुढे २१ जानेवारी रोजी मी जाऊन पाहिलं तर सर्वांना पैसे मिळत होते. गुंतवणूक करणारे लोक वाढत होते, मी पाहीलं की ५ ते ६ हजार लोक झाले होते. मग मी देखील ६ लाख ७० हजार रुपये गुंतवले. त्यानंतर दोन तीन आठवडे मलाही पैसे येत होते. आठवड्याला ४० हजार रुपये मिळत होते”.
“पैसे येत असल्याचे लक्षात आल्यानंतर मी माझ्या पत्नीच्या, मित्रांच्या तसेच नातेवाईकांच्या नावाने पैसे गुंतवण्यास सुरूवात केली. आठवड्याला पैसे मिळत होते त्यामुळे ते आले की सर्वांना थोडे थोडे पेसे परत देऊ असं ठरवलं. सर्वांना परतावा मिळत होता. मी आतापर्यंत किमान १ कोटी ५६ लाखांचे कर्ज घेतले आहे, जे अनेक बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून घेतले आहे. पण आता सर्वजण माझ्याकडे पैसे परत मागे मागत आहेत. माझ्या सांगण्यावरून अनेकांनी टोरेसमध्ये पैसे गुंतवले होते, ते माझंच नाव घेत आहेत. सध्या खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण मी लोकांना सांगत आहे की, टोरेस विरोधात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र शासन आणि प्रशासन काम करत आहेत. पैसा परत मिळेल असे मी त्यांना सांगत आहे”, असेही या भाजी विक्रेत्याने सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
‘टोरेस’ नावाच्या सोने, चांदी, हिरे यांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीने ३ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत कार्यालय सुरू केलं. गुंतवणुकीचाही व्यवसाय सुरू केला. दागिन्यांची विक्री केल्यास गुंतवणुकीवर ४ टक्के व्याज देण्याचं कबूल केलं. नंतर ही रक्कम वाढवून ६ टक्के केली. काही दिवसांपूर्वीच ११ टक्के व्याज परतावा देण्याचं कंपनीनं जाहीर केलं. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवण्यात आला. सुरुवातीच्या काळात सांगितल्याप्रमाणे व्याज परतावा दिला. पण सोमवारी अचानक सर्वच कार्यालयं बंद असल्यामुळे ग्राहकांमध्ये घबराट पसरली. काही कार्यालयांबाहेर ग्राहकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.