मुंबई : टोरेस गुंतवणूक योजनेद्वारे भारतातील शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यानंतर आता मुख्य आरोपी बल्गेरियातही टोरेसप्रमाणे गुंतणूक योजना राबवत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली आहे. मुंबई पोलीस सध्या या माहितीची पडताळणी करीत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत १२ हजार ७८३ गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेकडे आले असून फसवणुकीची एकूण रक्कम १३० कोटींच्या वर गेली आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यावधींचे नुकसान केल्यानंतर आता याप्रकरणातील फरार आरोपींनी बल्गेरियामध्ये टोरेसप्रमाणे गुंतवणूक योजना राबविण्यास सुरूवात केली केली असून त्यासाठी नव्या नावाने शो रुम उघडली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली आहे. त्याची पडताळणी सध्या सुरू असून आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
टोरेस प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच टोरेस कंपनीशी संबंधित फर्निचर, विद्युत उपकरणे, सात ते आठ मोटरगाड्या यांचा लिलाव करण्याबाबत एमपीआयडी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. तसेच टोरेसमधील आरोपींनी जयपूर येथील कंपनीतून मौल्यवान खडे खरेदी केले होते. त्या कंपनीने ते मोल्यवान खडे परत घेऊन पैसे देण्याची तयारी दर्शवली आहे. सुमारे दीड कोटी रुपयांच्या मौल्यवान खड्यांची पुन्हा विक्री करण्याबाबतची परवानगीही पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली आहे. त्याशिवाय याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम अधिकारी म्हणून नेमण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. त्यासाठीही परवानगी मागण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १२ हजार ७८३ गुंतवणूकदारांची १३० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे याप्रकरणात कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. हा संपूर्ण कट युक्रेनमधील नागरिक असलेल्या मुख्य आरोपीने रचला होता. या प्रकरणात आरोपी असलेले युक्रेनमधील आठ नागरिक आणि एक तुर्कस्तानमधील नागरिक सध्या फरार आहेत. पोलिसांनी संशयीत सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि इयुर्चेंको यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटिस जारी केली आहे. टोरेस प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने गैरव्यवहारातील २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. हा गैरव्यवहार उघड होण्यापूर्वी काही सतर्क नागरिक व गुंतणूकदारांनी पोलीस व इतर यंत्रणांना या प्रकरणाबाबत ई-मेलद्वारे माहिती दिली. याप्रकरणी ईडीही तपास करीत आहे. त्यांनी याप्रकरणी जयपूर व मुंबईतील १३ ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात संशयीत कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. तसेच, मे. प्लाटीनम हेर्न प्रा. लि.(टोरेस ज्वेलरी) आणि त्याच्या सहयोगी संस्थांच्या नावावर असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यात २१ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.