कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमधील तस्करांचा सहभाग?

मुंबई शहरातून कासव तस्करीची प्रकरणे उघड होण्यास सुरुवात झाली असून यामागे देशातील कर्नाटक, उत्तर प्रदेश व बिहार येथील तस्करांचा सहभाग असल्याची शक्यता यंत्रणांनी व्यक्त केली आहे. देशातील या तस्करांसाठी मुंबई ही एक प्रमुख बाजारपेठ असून येथून वर्षांला कोटय़वधी किमतीच्या ५० हजारांहून अधिक कासवांची तस्करी होत असल्याचा अंदाज प्राणीमित्र व्यक्त करत आहेत. या पाश्र्वभूमीवर देशातील तस्करांचा महाराष्ट्रातून होणारा हा चोरटा व्यापार रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी एकत्र येत विशेष मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.

भारत व एकूण आशिया खंडात कासव या प्राण्याबाबत मोठय़ा अंधश्रद्धा असून त्याला आध्यात्मिक महत्त्वही आहे. त्यामुळे विक्रीसाठी बंदी असलेल्या या कासवांची मोठय़ा प्रमाणात तस्करी होते. नुकतेच यामागे देशपातळीवरील मोठे रॅकेट असल्याचे उघड झाले आहे. मुंबईत गेल्या एक महिन्यात नवी मुंबईत २४, दादरला २२ व नंतर दादारच्याच रेल्वे स्थानकात ७५, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १९९ कासवे पकडण्यात आली. आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलेल्या कासवांना दुबई येथे नेण्यात येणार होते. मात्र, दोन जणांना मोठय़ा बॅगांसह सिमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडत वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. एका महिन्यात घडलेल्या या प्रकरणानंतर जंगली जैवसंपदा गुन्हे प्रतिबंधक विभागाने  या प्रकारांमागे कर्नाटक-उत्तर प्रदेशातील रॅकेट सक्रिय झाले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. कर्नाटकच्या बालगुडनहल्ली या गावातून गेल्या वर्षी कासवे मोठय़ा प्रमाणात उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे नेण्यात येत होती. मात्र ‘डब्ल्यूसीसीबी’ विभागाने यातील काही व्यक्तींनी अटक करत त्यांचे पितळ उघडे केले होते. मात्र, या एका महिन्यात दादर  रेल्वे स्थानकात कासवे पकडण्यात आल्याने पुन्हा हे रॅकेट सक्रिय झाले असावे अशी शंका ‘डब्ल्यूसीसीबी’चे अधिकारी ए. मारंको यांनी व्यक्त केली. सध्या पकडण्यात आलेली कासवे उत्तर प्रदेश व बिहार येथून मुंबईत पोहचल्याची शक्यता वन विभागाचे अधिकारी कंक यांनी सांगितले.

ऑनलाइन बाजारही जोरात

कासव व अन्य प्राणीविक्रीचा ऑनलाईन बाजार जोरात असून http://www.locanto.com/ या संकेत स्थळावरून स्वस्तात कासवांची खरेदी करण्यात येते. येथे ही कासवे ७०० – ८०० रुपयात मिळतात. कासव तस्कर ही कासवे १०० ते २०० रुपयांना विकत घेऊन बाजारात १००० ते १२०० रुपयांना विकतात. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवांची किंमत १० ते १५ हजार असल्याचे ‘पॉज’ संस्थेचे सुनीश कुंजू यांनी सांगितले.

कासव कुठून येतात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत पकडण्यात आलेली कासवे मुख्यत्वे स्टार टॉरटॉईज, इंडियन टेंट टर्टल, इंडियन रूफ टर्टल या जातींची असून त्यातील इंडियन टेंट टर्टल, इंडियन रूफ टर्टल ही अतिधोकादायक प्रकारात मोडत असून यातील एकही कासव महाराष्ट्रात आढळत नाही. ती मुख्यत्वे गंगा व ब्रह्मपुत्र नदीच्या पात्रात आणि दक्षिण भारतात आढळतात. तसेच यांची पैदास केंद्रेदेखील असून नर व मादी एकत्र ठेवून त्यांची अंडी इनक्युबेटर यंत्रात उबवून पैदास केली जाते. मुंबई हे विक्रीचे महत्त्वाचे केंद्र असून ५० हजाराहून अधिक कासवे येथून भारतात व भारताबाहेर जातात. क्रॉफर्ड मार्केट, कुर्ला मार्केट तसेच पाळीव प्राणी विक्री केंद्र यांचाही या व्यापारात सहभाग आहे, असा दावा मुंबईतील ‘रॉ’ या प्राणीमित्र संघटनेचे पवन शर्मा यांनी व्यक्त केला.