मुंबई : निरोगी आयुष्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आणि आदिवासी तसेच दुर्गम भागातील युवकांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘एचएसएनसी’ विद्यापीठाच्या फीट भारत क्लबतर्फे ‘केंद्र ते किनारा’ अशी दिल्ली ते मुंबई दरम्यान तब्बल १ हजार ४१५ किलोमीटरची सायकलवारी करण्यात येणार आहेत.

ही सायकलवारी दिल्लीतील इंडिया गेट येथून १८ जानेवारी रोजी सुरू होत असून पुढे पावटा, अजमेर, गंगापूर, रतनपूर, वडोदरा, सुरत, पालघर अशी मार्गक्रमण करीत या सायकलवारीचा २६ जानेवारी रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे समारोप होणार आहे. तसेच यानिमित्त वरळीतील ‘एचएसएनसी’ विद्यापीठात समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संपूर्ण मोहिमेत ११ विद्यार्थी आणि १ शिक्षक समन्वयक सहभागी होणार आहे.

हेही वाचा…खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार, परिवहन मंत्री

या मोहिमेचे नेतृत्व करणारे आणि फीट भारत क्लबचे शिक्षक समन्वयक मयूर दुमासिया हे दिव्यांग आहेत. आठ दिवसांच्या या मोहिमेत दररोज १९५ किलोमीटर प्रवास सायकलने करण्यात येणार आहे, तसेच या प्रवासादरम्यान माती आणि बियांचे मिश्रण असलेले गोळे पेरले जातील आणि आदिवासी बांधवांचीही भेट घेऊन त्यांच्याशी शिक्षणासंदर्भात संवाद साधण्यात येणार आहे. ‘एचएसएनसी’ विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. हेमलता बागला यांनी या मोहिमेसाठी विशेष सहकार्य केले आहे.

Story img Loader