भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्ररकणी दिल्लीतील जंतरमंतरवर काही महिला कुस्तीपटूंनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, पोस्को विशेष न्यायालयातील विशेष न्यायाधीश सीमा जाधव यांनी अशाच एका प्रकरणात महत्त्वाचा निर्णय केला आहे. स्पर्श करणे म्हणजे कोचिंग करणे नव्हे असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई कॉर्पोरेशन शाळेतील एका ४२ वर्षीय कुस्ती प्रशिक्षकाने रायगड जिल्ह्यातील पेण येथील एका रिसॉर्टमध्ये नेऊन विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. आरोपीने मुंबई पालिकेच्या परवानगीशिवाय विद्यार्थींनीना पेण येथे नेले होते. तसेच, यासाठी प्रत्येकीकडून २ हजार रुपये घेतले होते. अलिबाग येथे स्पर्धा असल्याचे सांगून त्यांना रिसॉर्टमध्ये नेण्यात आले होते. एवढंच नव्हे तर या स्पर्धेत आपण जिंकलो असल्याचं विद्यार्थ्यांनी घरी सांगावं असा दबावही या प्रशिक्षकाने आणला होता. हा सर्व प्रकार पालकांनी निनावी पत्राद्वारे डीसीपी कार्यालयाला पाठवला होता. या पत्रात त्यांनी वरील बाबी नमूद केल्या होत्या.

दरम्यान, याप्रकरणी २ सप्टेंबर २०१६ मध्ये प्रशिक्षकाला अटकही झाली. परंतु, २७ फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याला सोडण्यात आलं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर प्रशिक्षकाने त्याच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले होते. त्याला या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचं सांगितलं. परंतु, विशेष सरकारी वकील वीणा शेलार यांनी पीडितांची बाजू मांडली. पीडितांपैकीच दोघेजण साक्षीदार होते. एकदा कुस्ती सरावादरम्यान लैंगिक अत्याचार झाला, तर दुसऱ्यांदा सहलीदरम्यान अत्याचार झाल्याचा दावा या पीडितांनी केला होता.

“विद्यार्थ्यांच्या खासगी अवयवांना स्पर्श करणे, मुलींना क्रीडा कक्षात नेऊन त्यांच्या छातीला स्पर्श करणे म्हणजे प्रशिक्षण नव्हे, हे लैंगिक अत्याचार आहेत”, असं विशेष न्यायाधीश सीमा जाधव यांनी आरोपीला ठणकावलं. “चांगला आणि वाईट स्पर्श याबाबत मुलींना समज येते. तसंच, कोणताही पालक आपल्या मुलीची प्रतिष्ठा पणाला लावून असे खोटे आरोप करणार नाही”, असंही त्यांनी नमूद केलं. याप्रकरणी संबंधित प्रशिक्षकाला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Story img Loader