दोन जागांसाठी तीन उमेदवार
विधान परिषदेच्या मुंबई प्राधिकारी मतदारसंघातील दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात उतरल्याने मोठय़ा प्रमाणावर मतांची फोडाफोडी होण्याची चिन्हे असून, नगरसेवकमंडळींचा ‘भाव’ वाढणार आहे.
शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे मनोज कोटक या तिघांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत उद्यापर्यंत आहे. विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या ७६ मतांची आवश्यकता असून, शिवसेनेकडे तेवढे संख्याबळ आहे. काँग्रेसचे ५२ नगरसेवक असून, राष्ट्रवादीच्या १४ सदस्यांचा त्यांना पाठिंबा आहे. यामुळे काँग्रेसला १० मतांची आवश्यकता आहे. समाजवादी पक्ष मदत करेल, असा काँग्रेसला विश्वास आहे. भाजप आणि अपक्ष असे ३५ नगरसेवक असून, भाजपला अतिरिक्त ४० मतांची गरज आहे. मनसेच्या २८ मतांवर भाजपची सारी मदार आहे. मनसेचा पाठिंबा मिळाल्यास अन्य पक्षांमधील मते गळाला लागू शकतात, असे भाजपचे गणित आहे. राज ठाकरे यांनी सध्या तरी पत्ते खुले केलेले नसले तरी त्यांची भूमिका निर्णायक ठरेल. राष्ट्रवादीची मदत होईल, अशी चर्चा सुरू करून भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संशयाचे वातावरण तयार करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना व त्यांच्याबरोबर असलेल्या अपक्षांचे संख्याबळ जास्त असल्याने शिवसेनेने काही अतिरिक्त मते भाजपकडे वळती करावीत, अशी भाजपची भूमिका आहे. शिवसेना आणि भाजपमधील वाढती कटुता लक्षात घेता शिवसेना भाजपच्या पराभवाला हातभार लावेल, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.
काँग्रेस ५२ आणि राष्ट्रवादी १४ असे कागदावर एकूण संख्याबळ ७६ असले तरी ही सारी मते मिळतीलच याची काहीही खात्री देता येत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नगरसेवकांना ‘आपलेसे’ करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. कोणत्याही परिस्थितीत जागाजिंकायचीच, असा निर्धार भाजपने केला आहे. कोटक यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजीची भावना असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केली.

Story img Loader