राणीच्या बागेत मगरी पाहण्यासाठी पर्यटकांची तारेवरची कसरत

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील (राणी बाग) मगरींच्या तलावात प्रचंड प्रमाणात शैवालाचा (शेवाळ) थर निर्माण झाल्याने मगरी दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे तिकीट काढून आलेल्या पर्यटकांना मगरींचा अक्षरश: शोध घ्यावा लागतो आहे. याशिवाय गेल्या दोन आठवडय़ांपासून उद्यानातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही न सुटल्याने उद्यानात फेरफटका मारण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांचे घसेही कोरडे पडत आहेत.

[jwplayer 1yLms27W]

गेल्या काही दिवसांपासून राणीच्या बागेतील मगरी असलेल्या तलावात प्रचंड प्रमाणात शैवालाचा थर निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे. तलावात मगरी दिसाव्या यासाठी पाणी स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्या बघण्यासाठी त्यासाठी दूरवरून पर्यटक येथे येतात. परंतु शैवालाच्या थरामध्ये गुडूप झालेल्या मगरीने डोके वर काढले तरच त्यांचे दर्शन पर्यटकांना घेता येत आहे. तिकीट काढून बच्चेकंपनीला मगरी दाखविण्याकरिता येणाऱ्यांचा यामुळे हिरमोड होतो आहे. काही पर्यटक यावर जालीम उपाय योजत दगडांचा मारा करून मगरींना डोके वर काढायला भाग पाडत आहेत.

दूषित किंवा सांडपाण्यात मोठय़ा प्रमाणात बुरशी      वाढतात. त्यातून शेवाळ पसरते. पाण्यावर शेवाळ फैलावते, याचाच अर्थ ते प्रदूषित होते. त्यामुळे मगरींच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून राणीच्या बागेची होत असलेली दुरवस्था, प्राण्यांची देखभालीत होणारी हेळसांड यामुळे हे उद्यान चर्चेत आहे. त्यात आणखी एका चर्चेची भर पडण्याची शक्यता आहे. मगरी घाण पाण्यात जगू शकतात,  मात्र शैवाल आलेले हे पाणी अति प्रमाणात घाण झाले असण्याची शक्यता आहे. त्याचा मगरींच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.

उद्यानात कोरडा दुष्काळ

गेल्या काही दिवसांपासून राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी येथे एक जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे येथील पिण्याच्या सात टाक्यांपैकी अवघ्या एकाच टाकीत पाणी साठवता येत आहे. इतर सहा टाक्या कोरडय़ा पडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना कोरडय़ा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

शेवाळ वाढल्यावर साफसफाई

पाण्यावर सूर्यप्रकाश पडत असल्याने त्यावर वीड (नको असलेली झाडी) निर्माण होतात. आम्ही अधूनमधून ते साफ करत असतो. सध्याचे हे शेवाळ लहान-लहान आकाराचे आहे. त्यामुळे जाळीने काढता येत नाही. मात्र ती मोठी झाल्यावर या तलावाची साफसफाई होईल, असे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. तसेच जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पालिकेचे अभियंते आलेले आहेत. अवघ्या काही दिवसांत ही पाणीटंचाई दूर होईल, असेही त्यांनी सांगितले.

[jwplayer 8cIf7m5X]

Story img Loader