मुंबई : नाताळच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील पर्यटनस्थळी होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांना कोकणात थांबे देताना रेल्वे प्रशासनाने हात आखडता घेतल्यानंतर आता प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष रेल्वेगाडीला वीर, वैभववाडी रोड, सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हिवाळी पर्यटन आणि सणांच्या कालावधीत प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी तीन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला. यामध्ये गाडी क्रमांक ०११५१/०११५२ सीएसएमटी-करमळी, ०१४६३/०१४६४ एलटीटी-कोचुवेली आणि ०१४०७/०१४०८ पुणे-करमळी चालवण्याचे नियोजन केले आहे. नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. त्यामुळे या कालावधीत गाड्यांना अधिक गर्दी असते. गेल्या काही वर्षांपासून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. नाताळच्या कालावधीत शाळांना सुट्ट्या असल्यामुळे मुंबई, पुण्यातील नागरिक कोकणाची वाट धरतात. त्यामुळे सर्व नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण अगदी तीन महिने आधाही मिळणे बंद होते. त्यामुळे विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणारा होता. मात्र, या रेल्वेगाड्यांना कोकणातील रेल्वे स्थानकांवर थांबे देताना रेल्वे प्रशासनाने हात आखडता घेतल्याचे दिसते आहे. हिवाळी विशेष रेल्वेगाड्यांना कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात थांबा न दिल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. प्रवाशांनी मागणी केलेल्या सर्व नाही परंतु वीर, वैभववाडी रोड, सावंतवाडी रोड या स्थानकांवर विशेष गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
कोकण रेल्वे मार्गावरील महाड, रत्नागिरी, लांजा, राजापूर, वैभववाडी रोड, सावंतवाडी रोड ही स्थानके कोकणाच्या आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वाची आहेत. सणासुदीचा कालावधी तसेच पर्यटनाच्या हंगामात तेथील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे पर्यटनाच्या हंगामातील गर्दी लक्षात घेऊन कोकणातील स्थानकांवर रेल्वे थांबवण्यात यावी, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीच्यावतीने कोकण रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहारातून केली. त्यानंतर प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन गाडी क्रमांक ०११५१/०११५२ मुंबई-करमळी हिवाळी विशेष गाड्यांना वीर, वैभववाडी रोड आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू होण्यापूर्वीच वाढीव थांबे जाहीर केल्यामुळे आता प्रवाशांना गर्दीच्या हंगामात दिलासा मिळणार आहे.