सुहास जोशी
गेल्या दोन महिन्यांत शहरानजीकच्या पर्यटनस्थळांवरील गर्दी वाढली असली तरी राज्याबाहेरील सात ते दहा दिवसांच्या मोठय़ा सहलींकडे पर्यटकांचा ओढा कमी आहे. गेल्या महिनाभरात अशा सहलींच्या नोंदणीकडे कल वाढत असला तरी करोनापूर्व काळाच्या १० ते २० टक्केच व्यवसाय असल्याचे पर्यटन कंपन्यांनी सांगितले.
सध्या मोठय़ा सहलींसाठी चौकशी आणि नोंदणीचे स्वरूप संमिश्र आहे. अनेक पर्यटक लस येण्याची आणि सर्व काही स्थिरस्थावर होण्याची वाट पाहत आहेत. त्याच वेळी दोन-तीन कुटुंबे एकत्र येऊन एखाद्या टूरचे नियोजन करून देण्याची मागणी करत आहेत. पण करोनापूर्व काळाच्या तुलनेत हा प्रतिसाद १० ते २० टक्केच असल्याचे, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी सांगितले.
टाळेबंदीमुळे रद्द झालेल्या सहलींच्या रकमेच्या बदल्यात दिलेल्या पत पावत्या (क्रेडिट नोट) वटविण्यासाठीदेखील चौकशी सुरू आहे, मात्र विमान कंपन्या आणि परदेशातील हॉटेल्सनी अद्याप परतावा दिला नसल्याचे चौबळ यांनी नमूद केले. काही पर्यटक देशांतर्गत पर्यटनासाठी ही रक्कम वापरता येईल का, याची चौकशी करत आहेत, तर काहींना विदेशवारीच करायची असल्याने विदेश पर्यटन सुरू होण्याची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
सात ते दहा दिवसांच्या पर्यटनासाठी नोंदणीमध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून वाढ होऊ लागली आहे. यामध्ये सध्या हिमाचल, राजस्थान आणि काही प्रमाणात केरळमधील पर्यटनाकडे कल असल्याचे, थॉमस कुकचे अध्यक्ष राजीव काळे यांनी सांगितले. दोन ते तीन कुटुंबे एकत्र येऊन अशा सहलींना जात असल्याने पर्यटनस्थळी स्थानिक वाहतुकीसाठी मोठय़ा बसगाडीऐवजी आता टेम्पो ट्रॅव्हलरसारख्या छोटय़ा वाहनांना अधिक मागणी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
डिसेंबर-जानेवारीमध्ये अभयारण्ये, पक्षी अभयारण्ये येथील पर्यटनास प्रतिसाद असतो, मात्र अद्यापही रेल्वे आणि विमान वाहतूक पूर्ववत नाही, त्यामुळे प्रतिसाद कमीच असल्याचे विंहग ट्रॅव्हल्सचे मकरंद जोशी यांनी सांगतिले. त्यातच दुसऱ्या लाटेच्या चर्चेने पर्यटकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोठय़ा पर्यटनासाठी राज्याबाहेरच्या ठिकाणांना मर्यादित प्रतिसाद असला तरी सध्या राज्याअंतर्गत पर्यटनासदेखील वाव वाढत असल्याचे, ईशा टूर्सचे आत्माराम परब यांनी सांगितले. मात्र पंचतारांकित हॉटेल सवलती देत असताना राज्यातील स्थानिक हॉटेल मात्र अद्याप सवलती देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे त्यांनी सांगितले.
देशांतर्गत पर्यटनामध्येदेखील कमी गर्दीची आणि अपरिचित अशा पर्यटनस्थळी जाण्याकडे पर्यटकांचा कल असल्याचे, एसओटीसी ट्रॅव्हलचे अध्यक्ष डॅनिअल डिसुझा यांनी सांगितले.
सवलतींचा फायदा
* नोव्हेंबर ते जानेवारी हा मोसम डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच पूर्वनोंदणीसाठी पंचतारांकित हॉटेल्सनी मोठय़ा सवलती देऊ केल्या. राजस्थानसारख्या ठिकाणी एरवी या काळात केवळ विदेशी प्रवाशांचा राबता असणाऱ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सध्या भारतीयांना परवडेल अशा दरात राहण्याची संधी मिळत असल्याचे, थॉमस कूकचे राजीव काळे यांनी सांगितले.
* टान्झानियातील सेरेन्गिटी राष्ट्रीय उद्यानात फेब्रुवारी दरम्यान लहान विल्डबीस्ट आणि इतर शिकारी वन्यप्राणी यांच्यातील शिकारीचे दृश्य टिपण्यास जगभरातून छायाचित्रकार येतात. एरवी त्या काळात तेथील हॉटेल, वाहन अशा सर्वच सुविधांचे दर दुप्पट होतात. मात्र या वर्षी तेथील पर्यटन सुरू होताच त्यामध्ये तब्बल १२०० अमेरिकी डॉलर्सची सूट मिळत असून, त्याला काही प्रमाणात प्रतिसाद असल्याचे ईशा टूर्सचे आत्माराम परब यांनी नमूद केले.