भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) शक्ती वाघ, करिश्मा वाघिणीच्या जोडीने सहा महिन्यांपूर्वी जन्म दिलेले नर बछडे जय आणि रूद्र यांचे गुरवारपासून पर्यटकांना दर्शन घडणार आहे. तसेच तीन ते आठ महिन्यांपूर्वी जन्मलेले पेंग्विन डोरा, सिरी आणि निमो राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षात बागडताना पहायला मिळणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील सिद्दार्थ प्राणिसंग्रहालयातून १२ फेब्रुवारी २०२० रोजी शक्ती वाघ आणि करिश्मा वाघीण या जोडीला वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले होते. करिश्मा वाघीणिने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन नर बछड्यांना जन्म दिला होता. या दोन्ही बछड्यांचे वय ६ महिने ७ दिवस इतके आहे. पुढील दीड ते दोन वर्षे या बछड्यांना करिश्मासोबतच ठेवण्यात येणार आहे. प्राणिसंग्रहालयातील वैद्यकीय पथक जय आणि रूद्रची काळजी घेत असून वेळोवेळी त्यांचे लसीकरण आणि इतर महत्त्वाच्या तपासण्या करण्यात येत आहेत.
हेही वाचा >>> राज्यभरात ४१ लाख घरांच्या ताब्याची प्रतीक्षा – अजोय मेहता; विकासकांना दिला ‘हा’ इशारा
दरम्यान, प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षातील पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक अशा तीन पिलांना जन्म दिला आहे. पेंग्विन कक्षात सध्या नर आणि मादी अशा चार जोड्या आहेत. त्यातील डोनाल्ड आणि डेझी या जोडीने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी डोरा (मादी), मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने २ ऑक्टोबर २०२२ रोजी सिरी (मादी) आणि पपाय आणि ऑलिव्ह या जोडीने १३ डिसेंबर २०२२ रोजी निमो (नर) या तीन पिलांना जन्म दिला. सध्या डोरा, निमो आणि सिरी यांना प्रणिसंग्रहालयातील डॉ. मधुमीता काळे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
पर्यटकांना आवाहन
सध्या प्राणीसंग्रहालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून संग्रहालयातील प्राणी पिंजऱ्यात वावरताना दचकतात. तसेच काही पर्यटक प्राण्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काचेवर हात मारतात. यामुळे प्राण्यांच्या राहणीमानात व्यत्यय येतो. पर्यटकांनी उत्साहामध्ये अशा प्रकारचे कोणतेही वर्तन करू नये, असे आवाहन प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.