मुंबई : नाताळनिमित्त शाळांना सुट्टी पडली असून अनेकांनी पर्यटनासाठी मुंबईबाहेर जाण्याचे बेत आखले आहेत. दरम्यान, अनेक मुंबईकरांनी बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) प्राणी – पक्ष्यांचे दर्शन घेत नाताळच्या सुटीचा आनंद लुटला.
दिवसभर राणीच्या बागेत पर्यटकांची वर्दळ होती. बुधवारी झालेल्या तिकीट विक्रीतून महापालिकेच्या तिजोरीत तीन लाख रुपये महसूल जमा झाला. दुर्मिळ वनस्पती, पक्षांचा किलबिलाट, विविध प्राण्यांचे दर्शन घेण्यासाठी राणीच्या बागेत कायम पर्यटक येत असतात. शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या पडताच मोठ्या संख्येने पर्यटक राणीच्या बागेला भेट देतात. गेल्या काही वर्षांत राणीच्या बागेत नवीन प्राणी – पक्ष्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. यंदा नाताळनिमित्त बुधवारी दिवसभरात एकूण १० हजार ४११ पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. बुधवारी झालेल्या तिकीट विक्रीतून मुंबई महानगरपालिकेला ३ लाख ७४ हजार १५० रुपये महसूल मिळाला.
हेही वाचा – भाजपचा ‘व्होट जिहाद’चा आरोप निराधार : सप
दरम्यान, नाताळनिमित्त अनेक शाळांना बुधवारपासून सुटी लागली आहे. त्यामुळे या सुटीत मजा करण्यासाठी अनेकांनी मुंबईबाहेर जाण्याची योजना आखली आहे. तर, अनेकांनी मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. नाताळच्या सुटीनिमित्त पुढील काही दिवसात राणीच्या बागेत पर्यटकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.