मुंबई : पर्यटकांचे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या माथेरानच्या मिनी ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू असून २०२१ ते २०२२ मध्ये ३ लाख ६ हजार प्रवाशांनी यातून प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. यातून १ कोटी ७८ लाखांचा महसुलाचीही भर रेल्वेच्या तिजोरीत पडली आहे.
माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मिनी ट्रेनचे आकर्षणही असते. पर्यटकांमध्ये देशभरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांबरोबरच विदेशातील पर्यटकांचाही समावेश असतो. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी व्हिस्टाडोम डबाही (काचेचा पारदर्शक डबा) यात बसवण्यात आला. स्थानिकांनाही या ट्रेनची खूप मदत होते. टाळेबंदीकाळात माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद होती. टाळेबंदी शिथिल होताच नोव्हेंबर २०२० पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू केली. सध्या अमन लॉज आणि माथेरानदरम्यान मिनी ट्रेनच्या आठवडय़ाच्या दिवशी एकूण १६ फेऱ्या, तर आठवडय़ाच्या शेवटी २० फेऱ्या होतात. या फेऱ्यांना एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ३ लाख ६ हजार ७६३ पर्यटकांची वाहतुक मिनी ट्रेनमधून झाली असून ४२ हजारांहून अधिक मालवाहतूकही केली आहे. यामध्ये १ कोटी ७८ लाख प्रवासी, तसेच ३ लाख २९ हजार रुपये मालवाहतुकीतून मिळाले आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये ४२ हजार २१ आणि डिसेंबर २०२१ मध्ये ४३ हजार ५०० प्रवाशांनी वाहतूक केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.