लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नाताळनिमित्त वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला (राणीची बाग) हजारो पर्यटकांनी बुधवारी भेट देऊन नाताळचा आनंद लुटला. दर बुधवारी राणीची बाग देखभालीसाठी बंद ठेवली जाते. मात्र, बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्या दिवशी उद्यान सुरु ठेवून दुसऱ्या दिवशी पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. त्यानुसार गुरुवारी नियमाप्रमाणे उद्यान बंद ठेवण्यात आले होते. मात्र, संबंधित नियम माहित नसल्याने अनेक पर्यटकांना राणीच्या बागेच्या प्रवेशद्वारावरूनच पुन्हा मागे फिरावे लागले. पेंग्विन, वाघ, अस्वल, मगरी पाहण्यासाठी हरखून गेलेल्या चिमुकल्यांना बागेत प्रवेश न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला.

दुर्मीळ जातीच्या वनस्पती, हजारो झाडे, पक्षांचा किलबिलाट, विविध प्राण्यांचा वावर आदी नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या राणीच्या बागेत कायमच गर्दी असते. गेल्या काही वर्षात बागेत नवनवीन प्राण्यांची संख्या वाढल्याने त्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. पेंग्विन, वाघ, अस्वल, मगरी आदी विविध प्राण्यांविषयी लहान मुलांसह मोठ्यांनाही आकर्षण असते. त्यामुळे निसर्ग आणि प्राण्यांच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी अनेक पालक मुलांना राणीच्या बागेत घेऊन येतात. नाताळचे औचित्य साधून राणीच्या बागेत बुधवारी जवळपास दहा हजार पर्यटकांनी भेट दिली. गुरुवारीही सुट्टीचा बेत आखून अनेक पर्यटक राणीच्या बागेकडे वळले. मात्र, उद्यानात प्रवेश बंद असल्यामुळे त्यांना पुन्हा मागे फिरावे लागले.

आणखी वाचा-नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक

उद्यानाच्या दुरुस्तीकामास्तव दर बुधवारी राणीची बंद बंद ठेवली जाते. मात्र, मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार, बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले ठेवले जाते तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते. नाताळनिमित्त गुरुवारी उद्यान बंद बाबत पालिकेने पूर्वीच माहिती दिली होती. मात्र, नियम माहित नसल्याने अनेकजण मोठ्या उत्साहाने राणीच्या बागेकडे वळले. कुर्ला शीवसह टिटवाळा, कर्जत, नेरुळ, पनवेल आदी दूरवरच्या ठिकाणांहून पर्यटक राणीच्या बागेत आले होते. मात्र, सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वारासमोरच त्यांनी अडवून उद्यान बंद असल्याची माहिती दिली.

आणखी वाचा-सिंगापूर येथे नोकरीचे आमिष दाखवून अभियंत्याची फसवणूक

गावावरून चार दिवसांपूर्वी मुंबईत नातेवाईकांकडे राहायला आले आहे. मुंबईत येण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा राणीची बाग पाहिली, तेव्हा प्रसन्न वाटले होते. त्यामुळे पुन्हा इकडे आले. मात्र, उद्यान बंद असल्यामुळे पुन्हा घरी जात आहे. गावाला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा नक्की बागेत येईन, असे मीना गुप्ता या महिलेने सांगितले.

Story img Loader