उधाणलेल्या समुद्राच्या साक्षीने पावसात चिंब भिजण्याचा आनंद काही औरच. पण, समुद्रकिनाऱ्यावर पावसाचा आनंद लुटताना जेलीफिशपासून सावधान. जेलीफिशच्या प्रजातींमधील ‘ब्लू-बॉटल’ हा विषारी जेलीफिश शनिवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर आढळून आला. यामुळे नागरिकांनी उत्साहाच्या भरात समुद्रात उतरू नये, असा सल्ला सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समुद्रात हेलकावे घेणाऱ्या छत्रीच्या आकाराचे जेलीफीश आकर्षक दिसत असले तरी त्यातील काही प्रजाती आपल्याला जखमी करु शकतात. गेल्या काही वर्षांत गणपती विसर्जनावेळी जेलीफीशच्या डंखामुळे गणेशभक्त जखमी झाले होते. त्यामुळे जेलीफिशमुळे नागरिक धास्तावले होते.

मुंबईच्या समुद्रकिनारपट्टी परिसरात साधारण तीन प्रकारच्या जेलीफीश आढळतात. ठराविक मोसमात हे जेलीफिश किनाऱ्यालगत येतात. पावसाळ्याआधी ‘ब्लू-बटन’, पावसाळ्यात ‘ब्लू-बॉटल’ आणि पाऊस ओसरल्यावर ‘बॉक्स’ जेली फीश किनाऱ्यालगत येतात. वजनाने हलक्या असल्याने वाऱ्याच्या दिशेने हेलकावे खात ते समुद्रकिनारी पोहोचतात. त्यातील ‘ब्लू-बॉटल’ जेलीफीश विषारी म्हणूनच ओळखला जातो. शनिवारी सागरी परिसंस्थेचे अभ्यासक  प्रदिप पाताडे यांना गिरगाव चौपाटीवर ‘ब्ल्यू बॉटल’ जेलीफिश आढळला. त्याला २ इंच आकाराचे निळ्या रंगाचे फुग्यासारखे शरीर आणि ७ इंच लांबीचे दोरीसारखे पाय असल्याची माहिती पाताडे यांनी दिली.

  • ब्लू-बॉटल जेली फिशचा एखाद्याला डंख झाल्यास त्याठिकाणी लाल रंगाचे व्रण उठतात. तसेच त्या व्यक्तीस असह्य़ वेदना होतात.
  • काही वेळा ‘ब्ल्यू बॉटल’च्या डंखामुळे गाठ येते, असे प्रदीप पाताडे यांनी सांगितले.
  • ‘ब्ल्यू बॉटल’ने डंख केल्यास त्यावर प्राथमिक उपचार म्हणून खाण्याचा सोडा लावावा किंवा गरम पाणी सोडावे, असे ‘सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूट’चे माजी संशोधक डॉ. विनय देशमुख यांनी सांगितले.
  • ओहोटी असताना नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toxic jellyfish on mumbai beach