गेल्या सहा वर्षांमध्ये हाफकिन महामंडळावर १३ व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचा मंडळाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. महामंडळाचा कारभार सुरळीत चालावा यासाठी कायमस्वरुपी व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारे पत्र हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ कर्मचारी संघटनेने थेट अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री धर्मराव आत्राम आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव अश्विनी जाेशी यांना पाठवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ६ वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार; विधीसंघर्षग्रस्त मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी

हाफकिन मंहामंडळाअंतर्गत २०१७ मध्ये औषध खरेदी कक्ष सुरू करण्यात आला. तेव्हापासून सहा वर्षांमध्ये महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुमारे १३ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. मात्र यापैकी एकही प्रशासकीय अधिकारी एक वर्षापेक्षा जास्त काळ या पदावर टिकला नाही. औषध खरेदी कक्षातील अनागोंदी कारभारामुळे औषध वितरकांची देयके थकणे, रुग्णालयांना वेळेवर औषध पुरवठा न होणे, रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होणे आदी आरोप हाफकिन महामंडळावर झाले. हाफकिन महामंडळाच्या खरेदी कक्षातील अनागोंदी कारभारामुळे प्रशासकीय अधिकारी हैराण झाले. अखेर खरेदी कक्षातील अनागोंदी कारभारामुळे हाफकिन महामंडळाला व्यवस्थापकीय संचालक मिळेनासा झाला. त्यामुळे हाफकिन महामंडळाची रखडलेली कामे व प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आता कर्मचारी संघटनेनेच पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा >>> नोकरीच्या नावाखाली बँक व्यवस्थापकाची सायबर फसवणूक, नोकरीसाठी मुलाखत सुरू असताना क्रेडिटकार्ड वापरून केले अनधिकृत व्यवहार

हाफकिन महामंडळाचा कारभार सध्या प्रभारी असलेल्या अभिमन्यू काळे यांच्याकडे आहे. त्यांनी प्रभारी पद सांभाळल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली. आर्थिक उलाढालीबरोबर उत्पादन वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. कामगारांच्या पदोन्नतीसारखे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. तसेच महामंडळाच्या कारभारला गती देण्यासाठी उत्पादन विभागाचे सक्षमीकरण व अन्य बाबी भविष्यात राबिवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांच्याकडे प्रभारी पद असल्याने त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अभिमन्यू काळे यांनाच पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नेमण्यात यावे, असे पत्र हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ कर्मचारी संघटनेने थेट अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री धर्मराव आत्राम आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव अश्विनी जाेशी यांना पाठवले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trade unions letter to ministers and secretaries demanding permanent director for haffkine mumbai print news zws