दुकाने बंद करणाऱ्यांशी वादावादी; तरीही बंद कडकडीत
स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) दुकाने बंद करणाऱ्या व्यापाऱ्यांची ठाण्यात शनिवारी काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांशी हमरीतुमरी झाली. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास अटकाव केला, तर व्यापारीही या कार्यकर्त्यांना भिडले. त्यामुळे वागळे इस्टेट, किसननगर या भागांत काही प्रमाणात तणावाचे वातावरण होते. मात्र, शहरात अन्यत्र कडकडीत बंद पाहायला मिळाला.
एलबीटीविरोधात ठाण्यातील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद चालवल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नौपाडा, पाचपाखाडी, रेल्वे स्थानक परिसरातील काही ठराविक प्रभावी व्यापारी नेत्यांनी शनिवारपासून बंदची हाक दिल्याने सर्वसामान्य ठाणेकरांमध्ये कमालीची संताप व्यक्त होऊ लागला आहे. दुकाने बंद ठेवून सर्वसामान्यांना वेठीस धरू नये, अशा स्वरूपाची विनंती मनसेचे प्रमुख पदाधिकारी गुरुवारपासून व्यापाऱ्यांना करत आहेत. शुक्रवारी यासंबंधी काही बैठकाही घेण्यात आल्या. तरीही शनिवारी सकाळपासून ठाण्यात सर्व प्रमुख बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनेक ठिकाणी व्यापारी गटागटाने फिरून अन्य दुकानदारांना बंद करण्यास भाग पाडत होते.
किसननगर भागात दुकाने सुरू असल्याचे पाहून दुपारी काही व्यापाऱ्यांचे टोळके येथे येऊन दुकाने बंद करू लागले. याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. यावेळी व्यापारी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याने या परिसरातील तणाव वाढला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
एका गटाचा विरोध
बेमुदत बंदला ठाण्यातील व्यापाऱ्यांच्या एका मोठय़ा गटाकडून तीव्र विरोध आहे. मात्र, नौपाडय़ातील ठरावीक व्यापाऱ्यांच्या दंडेलशाहीपुढे या व्यापाऱ्यांचे काही चालेनासे झाल्याचे सूत्रांनी सांगितले.