रसिका मुळ्ये
करोनामुळे झालेल्या आर्थिक वाताहतीत जगभरात साहित्यनिर्मिती करणाऱ्या प्रकाशनसंस्था कोलमडल्या असून, महाराष्ट्रातील साहित्य फराळाची दिवाळी अंकांची शतकी परंपरा धोक्यात आली आहे. अंकाच्या किमती वाढवणे किंवा ई-अंक या पर्यायांसह यंदा अंक काढायचा की नाही, याचा निर्णय ऐनवेळी घेण्याचे बहुतांश मोठय़ा अंकांच्या संपादकांनी ठरविले आहे.
इतर सर्व उद्योगांसह जाहिरातींवर अवलंबून असलेली नियतकालिके, विशेषांक यांच्या व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. एकशे दहा वर्षांची परंपरा असलेल्या दिवाळी अंकांबाबत यंदा पहिल्यांदाच मोठय़ा अनिश्चिततेचे सावट आहे. दिवाळीच्या कालावधीत वाचकांच्या हाती अंक असावेत, असे नियोजन असते. त्यामुळे जून किंवा जुलैपासूनच अंकांचे काम सुरू होते. यंदा करोनामुळे झालेल्या पडझडीने प्रकाशक आर्थिक नुकसान आणि संभ्रम अशा दुहेरी कात्रीत सापडले आहेत. कथा, कादंबरी आणि वैचारिक लेखनाचा पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रिय-नामांकित अंकांसोबत आरोग्य, भविष्य अशा विषयांना वाहिलेलेही अंक दरवर्षी निघतात. हौस-मौज आणि जाहिरातींवर डोळा ठेवूनही काही अंक तयार होतात. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचे गट, वाचकांचे गट यांनीही अंक सुरू केले आहेत. या परिस्थितीत नामांकित आणि अनेक वर्षे दर्जा राखणारे अंक तरणार असून, नवख्या दिवाळी अंकांना फटका बसण्याची शक्यता प्रकाशकांनी व्यक्त केली. या अंकांचे अर्थकारण हे स्थानिक कंपन्या, राजकीय नेते यांच्या जाहिरातींवर अधिक अवलंबून असते.
किमती वाढणार
गेल्या काही वर्षांपासून जाहिरातींवर अवलंबून न राहता काही दिवाळी अंकांनी किमती वाढवल्या. यंदा आवश्यकता वाटल्यास किमती वाढवण्यावाचून पर्याय राहणार नाही, असे मत प्रकाशकांनी व्यक्त केले. मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे यांनी सांगितले, ‘आम्ही छापील अंकच काढण्याचा निर्णय घेतला आहे. आवश्यकता वाटल्यास अंकांच्या किमती वाढवाव्या लागतील. पाने कमी करणे, प्रती कमी करणे हा पर्याय असेल. विक्रीवर फार परिणाम होईल असे वाटत नाही. दिवाळी अंकांच्या विक्रीसाठी आमच्या योजना असतात. त्यासाठी इतरही काही अंकांनी विचारणा केली आहे.’
ऐनवेळी निर्णय..
राज्यात तीनशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात. अंकांचे नियोजन बहुतेकांनी सुरू केले असले तरी अंक कोणत्या स्वरूपात छापावा, याचा निर्णय दिवाळीच्या तोंडावर असलेली परिस्थिती पाहून घेण्याचा प्रकाशकांचा मानस आहे. अंकाच्या खर्चाचा ताळमेळ कसा साधावा, असा प्रश्न प्रकाशकांना भेडसावत आहे.
आम्ही सध्या छापील अंक प्रकाशित करण्याच्यादृष्टीने तयारी करत आहोत. मात्र, प्रत्यक्ष अंक छापील स्वरूपात प्रकाशित करावा का याचा निर्णय ऐनवेळी घेणार आहोत. परिस्थिती निवळली नाही तर ई-अंक प्रकाशित करण्याच्या पर्यायाचा विचार करावा लागेल. मात्र, वाचकांना अद्याप या पर्यायाची पुरेशी सवय नाही, याचाही विचार करावा लागणार आहे.
– हेमंत कर्णिक, संपादक, अक्षर