मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने कंदिल, दिवे, पणत्या, रांगोळी, रंग, माळा, सजावटीचे साहित्य, किल्ले, चित्र यांनी बाजारपेठ सजली आहे. साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी आहे. यंदा वेगवेगळ्या पारंपरिक कापडांच्या कंदिलांना ग्राहकांची विशेष पसंती असल्याचे दिसते आहे. खण, पैठणी, म्हैसूर सिल्क, टंचोई सिल्क, बंगळुरू सिल्क, इरकल या साड्यांपासून तयार करण्यात आलेल्या कंदिलांकडे ग्राहकांचा ओढा आहे.
दसरा होताच दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. यंदा भारतीय आणि हाताने बनवलेल्या विविध प्रकारचे आकाश कंदिल दाखल झाले असून पारंपरिक साड्यांपासून तयार करण्यात आलेल्या कांदिलांचे विशेष आकर्षण ग्राहकांना आहे. एका साडीत चार ते पाच कंदील तयार होतात. त्यानंतर साडीच्या किंमतीनुसार आकाश कंदिलाची किंमत ठरवली जाते. साडीपासून तयार करण्यात आलेल्या कंदिलांची किंमत ६०० रुपयांहून अधिक आहे. बाजारात तोरण, करंजी, हंडी, झुंबर, पारंपरिक षटकोनी, चौकोनी अशा विविध आकारांतील कंदिल उपलब्ध आहेत. करंजीच्या कंदिलाची किंमत १०० रुपयांपासून ते दहा हजार रुपयांर्यंत आहेत.
दिवाळीत दारा पुढील रांगोळी मिणमिणत्या प्रकाशाने उजळवणाऱ्या रंगबेरंगी पणत्यांचा दिमाखही सध्या वाढला आहे. दीपावलीनिमित्त बाजारपेठा सध्या विविध प्रकारांतील पणत्या, दिव्यांनी सजल्या आहेत. साध्या मातीच्या पणतीबरोबरच स्वस्तीक, शंख, फुले, कुयरी, चौकोणी, तुळशी वृंदावन, नारळ, घर, पंचारती अशा विविध आकारांतील पणत्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मातीच्या रंगवलेल्या, टिकल्या, खडे यांनी सजवलेल्या पणत्याही उपलब्ध आहेत. त्याशिवाय यंदा दगडी पणत्या, पणत्या ठेवण्यासाठी कोनडे किंवा देवळी, दीपमाळा यांनाही विशेष मागणी आहे. साध्या पणत्या ३० रुपये डझनापासून पाचशे रुपये प्रतिनग असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.