मुंबई: यशवंतराव चव्हाण (मुंबई-पुणे) द्रुतगती महामार्गावर गुरुवारी सव्वापाच तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. चिखले ब्रिज (साखळी क्रमांक कि.मी. ०७/५६०) येथे मुंबई वाहिनीवर मुंबई रेल विकास महामंडळामार्फत गुरुवारी (१८ जानेवारीला) गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावर सकाळी ११ ते दुपारी १.१५ वाजेपर्यंत, तर दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कामादरम्यान पूर्णत: बंद राहणार आहे. या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणारी हलकी वाहने मुंबई लेन कि.मी. क्र. ५५/५०० वरून वळवून मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणारी हलकी वाहने आणि बसगाड्या मुंबई लेन कि.मी.क्र. ३९/८०० खोपोली एक्झिटवरून वळवून मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणारी सर्व प्रकारची वाहने खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट (कि.मी. ३२/५००) येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना मुंबई पुणे मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेंडुग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ होतील.
द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणारी सर्व प्रकारची वाहने मुंबई लेन कि.मी. क्र. ९/६०० पनवेल एक्झिटवरून वळवून मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून करंजाडे मार्गे कळंबोली अशी मार्गस्थ होतील. तर मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेंडुग फाट्यावरुन सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ होतील. काम पुर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू होईल.