मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १२ फेब्रुवारी रोजी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील (पुण्याच्या दिशेने) कळंबोली गावाजवळ ओव्हर हेड गॅन्टी उभारण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कळंबोली गावाजवळील पट्ट्यातील वाहतूक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० ते दुपारी ३.०० या वेळेत ठेवण्यात येणार आहे. परिणामी, या पट्ट्यातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कळंबोली गाव – पनवेल सर्कल – देवांश ईन हॉटेल मार्गे पनवेल रॅम्पकडून द्रुतगती मार्गाने पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील कालावधीत दिलेल्या पर्यायी मार्गाचा उपयोग करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना अडचण आल्यास मोबाइल क्रमांक ९८२२४९८२२४ वरून नियंत्रण कक्षाशी किंवा मोबाइल क्रमांक ९८३३४९८३३४ वरून महामार्ग पोलीस विभागाशी संपर्क साधावा.