मुंबईः वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. त्याअंतर्गत अव्हेन्यु-३ मार्गावरील वाहनांना वी वर्क गॅप ते कनेक्टर जंक्शन व कनेक्टर जंक्शन ते एनएसई जंक्शनपर्यंत जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपायुक्त (मुख्यालय) समाधान पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत.
हेही वाचा – मुंबई : सतरा वर्षांची प्रतीक्षा संपणार, पत्राचाळीतील मूळ भाडेकरूही लवकरच हक्काच्या घरात
हेही वाचा – वर्षभरात २४ हजार मुलांवर मोफत शस्त्रक्रिया, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत मोहीम
बीकेसी येथे वाहनांची वर्दळ वाढल्याने तेथे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी बिकेसी परिसरातील मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळवून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत २१ जानेवारीपासून २० एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अव्हेन्यु-३ मार्गावरील वाहनांना वी वर्क गॅप ते कनेक्टर जंक्शन व कनेक्टर जंक्शन ते एनएसई जंक्शनपर्यंत जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याऐवजी तेथून जाणाऱ्या वाहनांनी ओव्हेन्यु-३ मार्ग- वी वर्क गॅप डावे वळण – वी वर्क बिल्डींग मागील बाजू उजवे वळण- कनेक्टर ब्रिज खालून एमएमआरडीए मैदान ( फटाका मैदान) – एनएसई जंक्शन येथून इच्छित स्थळी जातील. याबाबतचे आदेश वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.