Ratan Tata Death News मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. तसेच एनसीपीए ते वरळीतील स्मशानभूमी  दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी लक्षात घेता एनसीपीएपासून वरळीपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्यामुळे डॉ. ई. मोझेस मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. वरळी नाका ते रखांगी चौकपर्यंत डॉ. ई. मोझेस मार्ग बंद ठेवण्यात येणार असून दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत या मार्गिका बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. या कालावधीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या वाहनांशिवाय इतर वाहनांना ई. मोझेस मार्गावर प्रवेश करता येणार नाही.

हेही वाचा >>>केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अंबानी कुटुंबीयानी घेतले रतन टाटा यांचे अंत्यदर्शन

इतर वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. वाहनचालकांना रखांगी जंक्शन, महालक्ष्मी जंक्शन, लाला लजपत राय महाविद्याल, ॲनी बेझंट रोड मार्गे वरळी नाक्यावर जाता येईल. याशिवाय रंखांगी मार्ग, सेनापती बापट मार्ग येथून डावे वळण घेऊन पांडुरंग बुधकर मार्ग, जी. एम. भोसले मार्ग येथून वरळी नाक्यावर जाता येईल. तसेच वरळी नाका येथून ॲनी बेझंट मार्ग, लाला लाजपत राय महाविद्यालय, हाजी अली येथून महालक्ष्मी मंदिर परिसरात जाता येईल. तसेच वरळी नाका येथून जी. एम. भोसले मार्ग, दीपक सिनेमा, सेनापती बापट मार्गावरून रखांगी जंक्शन येथून इच्छीत स्थळी जाता येईल.

हेही वाचा >>>Ratan Tata : “..त्यावेळी रतन टाटांनी खुर्चीतल्या मृतदेहाशी संवाद साधला आणि..”, राज ठाकरेंनी सांगितला होता भन्नाट किस्सा

रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉईंट येथील एनसीपीएच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी उद्योजक, टाटा उद्योग समूहाच्या विविध कंपन्यांमधील कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक, राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी येत आहेत. यामुळे एनसीपीए परिसरात गर्दी होऊ लागली असून अंत्यदर्शनासाठी मोठी रांग लागली आहे.त्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. या परिसरात एक हजारांहून अधिक पोलिसांसह, वाहतूक पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल यांनाही तैनात करण्यात आले आहे. याशिवाय एनसीपीएपासून वरळीपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.