समीर कर्णुक
वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे लिंक रोडवर वाहतूक कोंडी
पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा आणि गेल्या काही वर्षांत वाढलेल्या कंपन्यांमुळे सदैव गजबजलेल्या घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवासी बेजार झाले आहेत. सुमारे दीडशे फूट रुंद करण्यात आलेल्या या रस्त्यावरील मोठा भाग वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे अडवला जात आहे. मात्र याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना सदैव वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.
घाटकोपर-अंधेरी लिंक रोड हा पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग समजला जातो. या मार्गालगतच्या परिसरात हजारो छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांची कार्यालये, गृहसंकुले, मॉल असल्याने दिवसरात्र येथून वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गाच्या परिसरात विमानतळ असल्याने येथील वाहतूक अविरतपणे सुरू असते. पूर्वी हा मार्ग केवळ ९० फुटांचा असल्याने मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे एमएमआरडीएने २००९ साली येथील रस्त्यालगत असलेली शेकडो दुकाने तोडून हा रस्ता १५० फुटांपर्यंत विस्तारला. त्यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या मोठय़ा प्रमाणात कमी झाली होती. शिवाय याच मार्गावर मेट्रोदेखील सुरू झाल्याने केवळ सायंकाळच्या वेळीच या मार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांत या मार्गावर अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अनधिकृतपणे वाहने उभी केली जात असल्याने पुन्हा या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.
घाटकोपरमधील दिशा रुग्णालय आणि असल्फा मेट्रो स्थानक परिसरात गॅस सिलेंडर टँकर, रिक्षा आणि खासगी वाहने रस्त्याच्या मधोमधच उभी केली जातात. भंगारात गेलेली वाहनेदेखील अनेक ठिकाणी वर्षांनुवर्षे पडून आहेत. एमएमआरडीने या ठिकाणी एका वेळी सहा वाहने जातील इतका मोठा रस्ता तयार केला आहे. मात्र सायंकाळी सहानंतर यातील चार ते पाच मार्गिकांवर वाहने उभी असतात. त्यामुळे केवळ एक किंवा दोनच मार्गिका वाहनांना जाण्यासाठी शिल्लक राहते. परिणामी घाटकोपरकडून साकीनाक्यापर्यंत जाण्यासाठी वाहनांना एक ते सव्वा तासाचा वेळ लागतो. याबाबत येथील स्थानिक रहिवाशांकडून अनेकदा वाहतूक पोलिसांना तक्रारी देण्यात आल्या आहेत. त्यानंतर वाहतूक पोलीस केवळ वाहनांची छायाचित्रे काढून निघून जातात, असा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
वाहतूक पोलिसांना वारंवार विनंती करूनही आजवर कारवाई झालेली नाही, अशी माहिती ‘एल’ विभागातील प्रभाग समिती अध्यक्ष किरण लांडगे यांनी दिली. तर यासंदर्भात वारंवार संपर्क करूनही वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
वाहुतकीची ‘हद्द’
असल्फा येथील बाळासाहेब ठाकरे चौकापासून भटवाडी ही हद्द घाटकोपर वाहतूक पोलिसांची आहे. त्यांच्याकडून या परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाते. मात्र साकीनाका वाहतूक पोलिसांच्या हद्दीत कोंडी दिसते. हे पोलीस या ठिकाणी फिरकतच नाहीत. तर घाटकोपर वाहतूक पोलीसही साकीनाक्याच्या हद्दीतील वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करतात, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.