मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर गेली सहा वर्षे सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या छेडानगर जंक्शनने अखेर मोकळा श्वास घेतला. शनिवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर येथील दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याने पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे.
गेल्या काही वर्षांत मानखुर्द-घाटकोपर जोडरस्ता आणि पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या छेडानगर जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी २०१८ मध्ये छेडानगर सुधारणा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. या अंतर्गत शीव येथून ठाण्याकडे जाण्यासाठी आणि मानखुर्दवरून ठाण्याकडे जाण्यासाठी असे दोन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या उड्डाणपुलांचे बांधकाम २०१८ मध्ये हाती घेण्यात आले. मात्र करोनाकाळात या उड्डाणपुलांची कामे रखडली होती.
हे ही वाचा…Mumbai Fire : मुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग, तिघांचा होरपळून मृत्यू
प्रवासाचा कालावधी दोन मिनिटांवर
‘एमएमआरडीए’ने छेडानगर सुधारणा प्रकल्पाअंतर्गत उभारलेला मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यावरून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा पहिला उड्डाणपूल एप्रिल २०२३ मध्ये वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे नवी मुंबईतून ठाणे आणि घाटकोपर परिसरात येणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याने ‘एमएमआरडीए’ने दुसऱ्या उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. काही दिवसांपूर्वी याच पुलाच्या कामामुळे चेंबूर सुमन नगर-छेडा नगर अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना अर्धा ते पाऊण तास लागत होता. मात्र उड्डाणपुल सुरू झाल्याने प्रवासाचा कालावधी दोन मिनिटांवर आला आहे.