लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करत कल्याण, डोंबिवली, ठाणे प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-पडघा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या उन्नत रस्त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असून यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सल्लागाराच्या नियुक्तीसाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा मागविल्या आहेत.

ठाणे-नाशिक महामार्ग हा महत्त्वाचा आणि रहदारीचा मागमार्ग आहे. अशात भिवंडी, शहापूर शहरात उभ्या राहिलेल्या गोदामांमुळे ठाणे-नाशिक महामार्गावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. अवजड वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ठाणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांना, भिवंडी, कल्याण, डोंबिवली प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. प्रवासासाठी बराच वेळ खर्ची करावा लागत आहे. पण आता लवकरच वाहनचालक-प्रवाशांची या वाहतूक कोंडीतुन, त्रासातुन सुटका होणार आहे. कारण या महामार्गाला समांतर असा ठाणे ते पडघा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ३० किमीच्या हा उन्नत रस्ता असणार असून यामुळे ठाणे ते नाशिक प्रवास, कल्याण, डोंबिवली, ठाणे प्रवास सुकर होणार आहे.

आणखी वाचा-एसटीची जागा भाडेतत्त्वावर देणार, ३० ऐवजी ६० ते ९० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव

राज्य सरकारच्या निर्देशानुसार एमएमआरडीएने या उन्नत रस्त्याचा सर्वंकष अभ्यास केला आहे. तर आता या उन्नत रस्त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. हा आराखडा तयार करण्याकरिता आणि यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याकरिता एमएमआरडीएने निविदा जारी केली आहे. तेव्हा सल्लागाराची नियुक्ती करत आराखडा तयार करण्यासाठी, तो मंजुर करत प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी बराच अवधी आहे. त्यामुळे या उन्नत रस्त्यावरून सुसाट प्रवास करण्यासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्याचवेळी महत्त्वाचे म्हणजे या सुसाट प्रवासासाठी वाहनचालकांना- प्रवाशांना पथकर मोजावा लागणार आहे. या रस्त्यावर पथकर आकारणी केली जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. तसेच हा उन्नत रस्ता मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion on thane nashik highway will be removed mumbai print news mrj
Show comments