मुंबई : वांद्रे पूर्व-पश्चिम, वांद्रे – कुर्ला संकुल, सांताक्रुझ, वाकोला, विर्लेपार्ले परिसरात आजघडीला वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. पश्चिम उपगनरातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत रस्ते यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांची कामे मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांच्या कामामुळे सध्या नागरिक, प्रवासी – वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. १५ मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण, एक तास लागत असल्याने वाहनचालक – प्रवासी पुरते हैराण होत आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून बीकेसीला ओळखले जाते. याच बीकेसीत मोठ्या संख्येने सरकारी, खासगी, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असून बँका, शाळा, रुग्णालयेही आहेत. बीकेसीत दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक कामानिमित्त येतात. अशावेळी बीकेसीत येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र असलेल्या बीकेसीतील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. बीकेसीत मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मानखुर्द) आणि मेट्रो ३ ( कुलाबा – वांद्रे – सीप्झ) मार्गिकांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी काही ठिकाणी रस्ते अंशत बंद करण्यात आले असून काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. बीकेसीमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न आहेच, पण त्याचवेळी बीकेसीतून कलानगर जंक्शन ते पुढे अंधेरीच्या दिशेने प्रवास करतानाही वाहनचालक – प्रवाशांना मोठी कसरत करावी लागती. कलानगर जंक्शन येथे चारही दिशेने वाहने येतात, त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडीत वा सिंग्नलमध्ये अडकावे लागते.
हेही वाचा…ऐन गर्दीच्या वेळेस ‘मेट्रो १’ विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे सेवा १
एमएमआरडीएकडून सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणाअंतर्गत वाकोला नाला ते पानबाई इंटरनॅशनल स्कुलदरम्यान उन्नत रस्ता बांधण्याचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. तर त्याचवेळी मेट्रो तीनच्या कामासाठी वाकोला ते सांताक्रुझ दरम्यान उड्डाणपुलाखालील रस्ता आजूबाजचे काही रस्ते अंशत बंद करण्यात आले आहेत. या कामांमुळे वाकोला, सांताक्रुझ परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाकोला, साताक्रुझ, विर्लेपार्ले परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी असते.