मुंबई : मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश प्राप्त झाला आहे. संदेश पाठणाऱ्याने काही व्यक्ती मुंबई व धनबाद येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचेही संदेशात म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हे संशयित काम करत असल्याचे संदेशात म्हटले आहे. या संदेशाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्या बाबतचा संदेश शनिवारी पहाटे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. त्यात काही संशयितांच्या नावाचा उल्लेख करून या व्यक्ती कंपनीमध्ये बेकायदा शस्त्र निर्मिती करत आहेत. भारतीय लष्कराला उद्धवस्त करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. त्यात प्रिन्स व इफान अशा दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून त्यातील एक धनबाद व दुसरा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणार आहे, असेही संदेशात म्हटले आहे.
हेही वाचा…ज्येष्ठांना मंत्रीपदाचे वेध; महायुतीत बहुसंख्य अनुभवी आमदार असल्याने वरिष्ठांपुढे निवडीचा तिढा
या संदेशात इरफान नावाच्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांकही देण्यात आला आहे. हा संदेश प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. संदेश पाठवणाऱ्या मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून संदेश देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. संदेश देणाऱ्याची माहितीही मिळाली असून त्याने या व्यक्तींना अडकवण्याच्या हेतूने हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत मुंबई पोलीस तपास करत आहेत. दुसऱ्या बाजूला नियमाप्रमाणे धमकीच्या संदेशानंतर यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून त्यांनी आवश्यक उयाययोजना केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात एका महिलेने दूरध्वनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची तयारी सुरू असून त्यांच्याकडे शस्त्र असल्याचे सांगितले होते. त्यानंतर महिलेने दूरध्वनी बंद केला. तपासणीत तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे स्पष्ट झाले होते.
हेही वाचा…लोकसत्ता अर्थभान : गुंतवणुकीचे मार्ग, इच्छापत्राविषयी मार्गदर्शन
गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अशा धमक्यांच्या दूरध्वनीने शंभरी गाठली. नुकताच रिझर्व बँक ऑफ इंडियालाही एक धमकीचा दूरध्वनी आला होता. हा दूरध्वनी रिझर्व बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर आला होता. फोनवर असलेल्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर-ए-तैयबा’चा मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा केला होता. अभिनेता सलमान खान व शाहरुख खान यांनाही धमकीचे संदेश व दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही मारण्याची धमकी देणारा संदेश पोलिसांना प्राप्त झाला होता.