मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाह सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अनंत आणि राधिका यांची वरातही लक्षवेधी ठरली. मात्र, अनंत अंबानी यांच्या वरातीतील सहभागी आलिशान विदेशी वाहनांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षभरापासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्याची चर्चा सुरू होती. अखेरी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांचा विवाह पार पडला. या लग्न सोहळ्यास जगभरातील विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी उपस्थित होती. भव्य सजावट, रोषणाई आणि देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती यामुळे अनेकांचे लक्ष या विवाह सोहळ्याकडे लागले होते. तसेच या लग्नाच्या वऱ्हाडात विदेशी आलिशान वाहनांचा ताफा दिसत होता. हा ताफाही मुंबईकरांसाठी आकर्षण ठरला होता. मात्र, या ताफ्यातील अनेक वाहन क्रमांकाच्या पाट्या नियम धुडकावून बसविल्याचे आढळून आले. त्यामुळे या वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी अभियंत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

ऑक्टोबर २०२३ रोजी खरेदी करण्यात आलेल्या रोल्स रॉयसची नोंदणी मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयातून करण्यात आली आहे. या वाहनाचा वाहन क्रमांक असा ‘एम ०१ ईपी ०००१’ आहे. मात्र, तो ‘एम ०१ ईपी’ असा नमुद करण्यात आला आहे. वाहन क्रमांक पाटीवर ‘०००’ वगळून केवळ ‘१’ असे नमुद करण्यात आले आहे. वाहन क्रमांकात बदल केल्यामुळे मोटार वाहन अधिनियमाच्या कलम ५० नुसार कारवाई करण्यात येते. मात्र, काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवर कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा >>> मिहीर शाह याची कबुली, “मी अनेकदा…”; पोलिस तपासात दिली माहिती

सर्वसामान्यांनी वाहतुकीचे नियम मोडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. तर, दुसरीकडे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना कायदे, कारवाईच्या कचाट्यातून सूट देण्याचे प्रकार घडत असल्याचे निर्दशनास येत आहे. मुंबईतील रस्त्यांवर ‘व्हीआयपी’व्यक्तींच्या वाहन क्रमाकांच्या पाट्या (नंबर प्लेट) नियमबाह्य असूनही परिवहन विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नियमबाह्य वाहन क्रमांक असलेल्या पाट्यांवर नियमितपणे कारवाई केली जाते. तसेच मुंबईच्या रस्त्यांवर नियमबाह्य वाहन क्रमांकाच्या पाट्या निदर्शनास आल्या किंवा कोणी आणून दिल्या. तर, त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल. – विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त