लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: ओबीसी आरक्षण, महिला आरक्षण, खोपर्डी घटनेतील आरोपींच्या शिक्षेची अंमलबजावणी आदी विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी आझाद मैदान येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते बुधवारी चेंबूरमधील पांजरापोळ सर्कल येथे दाखल झाल्याने शीव-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी पुन्हा एकादा आजाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलनाचे केले. ‘एक मराठा लाख मराठा’ आशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आझाद मैदान दुमदुमून सोडले होते. खोपर्डी घटनेतील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करा, ओबीसी जातीतील प्रवर्गातील जातीचे फेरसर्वेक्षण, गायकवाड आयोगाच्या शिफारीनुसार मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा आदी विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
नवी मुंबई परिसरातून कार्यकर्ते बुधवारी सकाळी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले. दुपारी १२ च्या सुमारास आंदोलक चेंबूर पांजरापोळ सर्कल येथे दाखल झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रस्त्याच्या एका बाजूला उभे राहण्याची सूचना केली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केला. मात्र परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना पुढील मार्ग मोकळा केला. त्यानंतर आंदोलक आपआपल्या वाहनांमध्ये बसून आझाद मैदानकडे रवाना झाले. दरम्यान, यामुळे नवी मुंबई येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही वेळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.