मुंबई : आरे मार्गावर मॉडर्न बेकरी बस थांबा ते आरे रुग्णालय या भागात अनेक ठिकाणी महापालिकेतर्फे खड्डे खोदण्यात आले आहेत. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला वर्षही पूर्ण झालेले नसताना जागोजागी खड्डे खोदण्यात आल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच खड्ड्यांच्या आसपास केलेल्या बॅरिकेडिंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट ठेवून महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू केले आहे. मात्र, काँक्रीटीकरण झाल्यानंतरही अनेक ठिकाणी पुन्हा रस्त्यांवर खोदकाम केले जात आहे. त्यामुळे पालिकेच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक ठिकाणी रस्ते सुस्थितीत असतानाही ते खोदून पुन्हा काँक्रीटीकरण केले जात असल्यामुळे मुंबईच्या काही भागांमधून काँक्रीटीकरणाला विरोध होत असल्याचेही नुकतेच समोर आले होते. आता आरे मार्गावरही अनेक ठिकाणी काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा खोदकाम करण्यात आले आहे. खोदलेला खड्डा भरल्यानंतर पुन्हा दोन दिवसांत अन्य ठिकाणी नवीन खड्डा खोदला जात असल्याचे आरे येथील नागरिकांनी सांगितले आहे. आरे मार्गावर मॉडर्न बेकरी बस थांबा ते आरे रुग्णालय या भागात सद्यस्थितीत सुमारे सात ते आठ खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले असून वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर काही ठिकाणी भेगा पडल्यामुळे तेवढा भाग खोदला जात आहे. तसेच, संबंधित भागाची तात्काळ दुरुस्तीही केली जात आहे, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला १ वर्षही पूर्ण झालेले नाही. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून रस्ता सुस्थितीत असतानाही त्यावर सातत्याने खोदकाम केले जात आहे. याचे नेमके कारणही प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही, असे ग्रेगरी ग्रेसिया या स्थानिक रहिवाशाने सांगितले.

Story img Loader