मुंबई : टपाल कार्यालयातील वितरणाचे टपाल आणि इतर पार्सल घेऊन जाणारा एक टेम्पो शनिवारी दुपारी १ च्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर उलटल्याने या मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. परिणामी, वाहनचालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
शीव येथून नवी मुंबईच्या दिशेने दुपारी १ च्या सुमारास हा टेम्पो जात होता. पूर्व द्रुतगती मार्गावरील एव्हरार्ड नगर येथे अचानक वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा टेम्पो उलटला. सुदैवाने अपघाताच्या वेळी तेथे वाहनांची संख्या कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र या अपघातानंतर या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा – मुंबई : नागरिकांना कचऱ्याची तक्रार आता थेट व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर करता येणार
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ टेम्पोमधील सामान बाहेर काढण्यात आले. वाहतूक कोंडी वाढू नये यासाठी क्रेनची वाट न पाहता नागरिकांनी रस्त्यावर उलटलेला टेम्पो उभा केला आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.