सलग दोन दिवस पावसाचा जोर कायम असून पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या. शुक्रवारी दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरापेक्षा पश्चिम उपनगरात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकत होती. तर, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गासह इतर रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा >>> पावसात तुमचा बॉस ऑफिसला बोलवत असेल तर ‘हा’ Video पाठवाच; मुंबई लोकलचा प्रवास खाऊ नाहीच!
पश्चिम उपनगरात कांदिवली, जोगेश्वरी, दहिसर, मालाड, गोरेगाव, अंधेरी आणि वांद्रे येथील डांबरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यांमध्ये आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच दुचाकीस्वारांना दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडूप ते गांधी नगर, ऐरोली टोल नाका येथे शुक्रवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. जोगेश्वरी – विक्रोली लिंक रोडवरून (जेव्हीएलआर) जोगेश्वरी, पवई परिसरात जाण्यासाठी प्रवाशांना दोन तास कालावधी लागत होता. वाकोलावरून कलिनाच्या दिशेने एकाच ठिकाणी १५ मिनिटे वाहने थांबली होती.
मोहरममुळे वाहतूक मार्गात बदल
मुंबईतील विविध भागात शनिवारी मोहरमनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. मानखुर्द वाहतूक विभागाच्या हद्दीत कचरपट्टी जंक्शन जवळील करवाला मैदान येथे मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासह कुर्ला, भायखळा, माहीम येथेही मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.