मुंबई : ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर पूल जीर्ण झाल्याने त्याची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाली असून कर्नाक पुलावरील वाहतूक २२ ऑगस्टपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील वाहतूक युसूफ मेहरअली मार्गावरून वळवण्यात येणार आहे. या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दक्षिण मुंबईतील कर्नाक बंदर उड्डाणपूल साधारण दीडशे वर्ष जुना आहे. लोखंडी गर्डर आणि दगडी बांधकामाचा वापर करून हा पूल उभारण्यात आला होता. आयआयटी, मुंबईने २००९ मध्ये केलेल्या संरचनात्मक तपासणीअंती हा पुल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून लवकरच त्याचे पाडकाम करण्यात येणार आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी युसुफ मेहेरअली रोडवर मालवाहू हातगाड्यांना २४ तासांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. यासह युसुफ मेहेरअली रोड दक्षिण आणि उत्तर वाहिनीवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
वाहतूक वळवण्याची ठिकाणे
– पोहमल जंक्शनवरून पी. डिमेलो रोडकडे येणारी उत्तर वाहिनीवरील वाहतूक सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत बंद राहील. या मार्गावरील वाहनचालकांना मोहम्मद अली रोड-हिमालय जंक्शन-सीएसएमटी जंक्शन- अवतारसिंग बेदी चौकमार्गे त्यांच्या इच्छितस्थळी जाता येईल. तसेच मोहम्मद अली रोडवरून भेंडीबाजार जंक्शन येथे उजवे वळण घेऊन एस. व्ही. पी. रोड-वाडीबंदर जंक्शन येथून डावे वळण घेऊन पी. डिमेलो रोडवर जाता येईल.
– कुंदनलाल काटा येथून पोहमल जंक्शनकडे येणारी दक्षिण वाहिनीवरील वाहतूक दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. या मार्गावरील वाहनचालकांनी वाडीबंदर जंक्शन येथून उजवे वळण घेऊन एस. व्ही.पी. रोड- एस.टी. जंक्शन- भेंडीबाजार जंक्शन येथे डावे वळण घेऊन मोहम्मदअली रोड मार्गे इच्छित स्थळी जावे. पी. डिमेलो रोडवरून कुंदनलाल काटा येथे उजवे वळण घेऊन पोहमल जंक्शनकडे जाणारी वाहतूक ही अवतारसिंग बेदी चौकमार्गे- सीएसएमटी जंक्शन-एलटी रोड येथे डावे वळण घेऊन मोहम्मदअली रोड मार्गे जाईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.