ठाणे येथील घोडबंदर मार्गावरील काजूपाडा येथे सोमवारी सकाळी कंटेनर वळण घेत असताना रस्त्याच्या बाजूला खड्डय़ामध्ये जाऊन अडकला तसेच पाठीमागून येणारा कंटनेरही तेथेच येऊन बंद पडल्याने वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली . यामध्ये मुंबई तसेच वसई-विरार मार्गे ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने अडकून पडली होती.
  काजूपाडा येथील एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर खड्डय़ामध्ये जाऊन अडकला. कंटनेर ठाण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. याच वेळी पाठीमागून येणारा कंटेनर पुढे जाताना त्याची खड्डय़ातील कंटनेरला धडक बसली व तोही तेथेच बंद पडला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाल्याने ठाण्याच्या दिशेने येणारी सर्व वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडली. त्यानंतर ठाणे शहर व ग्रामीण वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुंबई तसेच वसई-विरारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील एक लेनमधून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा संथगतीने सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने दोन्ही कंटेनर बाजूला करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.