मुंबईत आलेल्या परदेशी पर्यटकांना मणीभवन येथे वाहतूक पोलिसाकडून कटू वागणूक मिळाल्यानंतर, वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी याची दखल घेत परदेशी पर्यटकांशी अदबीने वागण्याचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. सोमवारी परदेशी पर्यटकांना आलेल्या या कटू अनुभवाबाबत ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी परदेशी व देशांतर्गत पर्यटकांच्या वाहनांना शहरातील कोणत्याही रस्त्यांवर कोणत्याही वेळी प्रवेश देण्यात येणार असून, या पर्यटकांना कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
‘अतिथी देवो भव’ची संस्कृती भारतात जपली जात असताना, अनेकदा मात्र देशात येणाऱ्या पर्यटकांना पोलीस, विक्रेते, रिक्षा-टॅक्सीचालक यांच्याकडून कटू वागणूक मिळाल्याचे प्रकार घडतात. या सोमवारीदेखील मुंबईतील मणीभवन येथील गांधी संग्रहालयाला भेट देण्यास आलेल्या १७ अमेरिकी वृद्ध पर्यटकांना व त्यांच्यासह असलेल्या पर्यटक मार्गदर्शकांना वाहतूक विभागाच्या पोलिसाकडून आक्रमक वागणूक मिळाली होती. याची दखल घेत ‘लोकसत्ता’मध्ये वृत्तही प्रकाशित करण्यात आले. त्याची दखल घेत, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त (शहरे) अनिल कुंभारे यांनी तत्काळ अधिकाऱ्यांची व शासनमान्य पर्यटक मार्गदर्शकांची बैठक बोलावली. यात घडल्या प्रकाराबद्दल माहिती घेत त्याचे गांभीर्य ओळखून परदेशी व देशांतर्गत पर्यटकांच्या मोठय़ा बसेसना शहरातील कोणत्याही रस्त्यावरून, कोणत्याही वेळी जाण्याची मुभा असून त्यांच्याशी अदबीने वागण्याचे लेखी आदेश अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिले. शहरातील रस्त्यांवर जिथे मोठय़ा वाहनांना बंदी असे फलक असतात, तेथून पर्यटकांच्या बसेस जाऊ शकतात. पुढे कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याकडून गैरवर्तन झाल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा, असे बैठकीला उपस्थित पर्यटक मार्गदर्शकांना कुंभारे यांनी सांगितले. मुंबई बंदरात दर सोमवारी परदेशी पर्यटकांच्या क्रूझ बोटी येतात. या पर्यटकांना घेऊन दहा ते पंधरा बसेस प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी निघतात. अशा वेळी वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कर्मचारी नेमणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा