सर्व वाहतूक पोलीस विभागांना तातडीने वसुलीचे आदेश

सुशांत मोरे, मुंबई

वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात सीसीटीव्हींद्वारे ई-चलान करून दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात येत असला तरीही दंडाची वसुली करण्यात पोलिसांना अपयशच येत आहे.

आतापर्यंत केलेल्या कारवाईत राज्यात ५४ लाख ई-चलान झाले असून त्यांच्याकडून दंडवसुलीच झालेली नाही. त्यामुळे वसूल न झालेल्या दंडाची रक्कम १८८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यात एकटय़ा मुंबईतील ३० लाख ई-चलानची ९० कोटी रुपयांची दंडवसुली प्रतीक्षेत आहे. मोठय़ा प्रमाणात असलेली दंडाची रक्कम पाहता पाच हजार व त्यापुढीलदंडाची रक्कम प्रलंबित असलेल्या चालकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश राज्यातील सर्व वाहतूक पोलीस विभागांना अपर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) दिले आहेत.

वेगाने वाहन चालवणे, विना हेल्मेट, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, झेब्रा क्रॉसिंगपुढे वाहन उभे करणे इत्यादी वाहतूक नियम मोडणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात सीसीटीव्हींमार्फत कारवाई करून दंडवसुली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि प्रथम डिसेंबर २०१६ पासून मुंबईत प्रकल्प राबवण्यात आला. त्यांनतर याची व्याप्ती नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, जळगाव, सांगली, चंद्रपूपर्यंत वाढवली. सीसीटीव्हींमार्फत कारवाई करताना त्या वाहनचालकाचा वाहन क्रमांक टिपला जातो. त्यानंतर चालकाच्या मोबाइलवर ई-चलान पाठवण्यात येते. यामध्ये दंडाची रक्कम व ती भरण्याची मुदत इत्यादी माहिती नमूद केली जाते. हा दंड ऑनलाइन किंवा जवळच्या वाहतूक पोलीस चौकीत जाऊन भरण्याचीही सुविधा केली आहे.

परंतु ई-चलान झाल्यानंतरही वाहनचालक दंड भरत नाही. त्यामुळे कारवाई करूनही त्याचा काहीएक फायदा होत नसल्याचे समोर आले. त्यामुळे ई-चलान न भरणाऱ्या चालकांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत राज्यात ५३ लाख ७ हजार ६३९ ई-चलानची दंडवसुली झालेली नाही. त्यांची दंडाची रक्कम ११८ कोटी ८० लाख ४४ हजार ५५४ रुपये एवढी आहे. यामध्ये मुंबईतील ई-चलानचा समावेश असून ३० लाख ३४ हजार ५६४ ई-चलानची ९० कोटी ५७ लाख ९१ हजार रुपये दंडवसुलीही झालेली नाही. उर्वरित ई-चलान हे राज्यातील अन्य शहरांतील आहेत.

अधिक दंडाची रक्कम.. राज्यात पाच हजार व त्यापेक्षा जास्त दंड वसूल न झालेले ई-चलान ९ हजार १११ असून त्यांची ६ कोटी ५७ लाख ९५ हजार ८०० रुपये दंडवसुलीची प्रतीक्षा आहे. यामध्ये ३ हजार ४१० ई-चलान मुंबईतील असून त्याची रक्कम २ कोटी ४३ लाख ३ हजार एवढी असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

दंडवसुली किती?

राज्यात आतापर्यंत ३१ लाख ३ हजार ४१३ ई-चलानची ८८ कोटी ३३ लाख २८ हजार रुपयांची दंडवसुली झाली आहे. यामध्येही मुंबईतील ८ लाख १२ हजार ५०१ ई-चलानची वसुली झाली आहे.

राज्यातील सर्व वाहतूक पोलीस विभागांना ई-चलान वसुलीचे आदेश दिले आहेत. यात प्रामुख्याने पाच हजार आणि त्यापेक्षा जास्त दंड असलेल्या ई-चलानची वसुली करावी, असे आदेशात म्हटले आहे. रस्त्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईवेळी एखादा चालक दोषी आढळला व त्याची यापूर्वीचीही दंडाची वसुली शिल्लक असेल तर ती तात्काळ वसूल केली जाईल. जे चालक दंड भरणार नाहीत त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.

– विजय पाटील, पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस-मुख्यालय)