मुंबई : विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला रोखण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांना दुचाकीने धडक दिल्याची घटना मालाड (प.) परिसरात घडली. या अपघातात पोलिसाच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी मालवणी पोलिसांनी सदर दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.

पोलीस हवालदार हेमंत बागुल कांदिवली वाहतूक विभागात कार्यरत असून ते गुरूवारी मालाड (प.) परिसरातील जनकल्याण नगर येथे वाहतूक नियमन करण्यासाठी तैनात होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने दुचाकी चालवत असल्याचे बागुल यांनी पाहिले. बागुल यांनी तात्काळ दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा दिला. पण थांबण्याऐवजी चालकाने दुचाकीचा वेग वाढवला. त्यावेळी बागुल यांनी दुचाकीस्वाराला थांबण्यास सांगितले. मात्र भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने बागुल यांना धडक दिली. त्यामुळे बागुल खाली कोसळले. त्यानंतर दुचाकीस्वाराने तेथून पळ काढला.

हे ही वाचा…नऊ मीटर रस्त्यावरही तीन इतके चटईक्षेत्रफळ!  गृहनिर्माण धोरणात विकासकांना गाजर

या अपघातात बागुल यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले असून त्यांच्या डाव्या हाताची करंगळी आणि डाव्या पायाला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बागुल यांंच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.