नवी मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलापूर खिंडीच्या सपाटीकरणाला लवकरच सुरुवात केली जाणार असून सध्या ही खिंड एका बाजूने विस्तारित करण्याचे काम सुरू आहे. पूर्वेकडच्या बाजूने ही खिंड अकरा मीटरने कापण्यात आली असून त्या मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने ही खिंड दहा फूट खाली सपाट केली जाणार आहे. या मार्गाच्या जोरदार कामामुळे सध्या वाहतूककोंडी होत असून पर्यायी मार्ग नसल्याने ही कोंडी पुढील दीड वर्ष सहन करावी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले. नवी मुंबई हे आधुनिक शहर असले आणि त्याचे वयोमान जेमतेम ४० वर्षे असले तरी या परिसरात काही ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांपैकी एक मानली जाणारी बेलापूर खिंड रस्त्याच्या कामात नामशेष होणार आहे.
सायन पनवेल महामार्गाचे दहा पदरी रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. ‘बांधा- वापरा- हस्तांतरित करा’ या तत्त्वावर उभारण्यात आलेले हे सिमेंट काँक्रिटीकरण व रुंदीकरण तब्बल नऊ महिने विलंबाने सुरू झाले आहे. एक हजार २२० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता वेगाने पुढे सरकत असून पाच उड्डाणपुलांच्या कामामुळे सध्या या मार्गावर सकाळ-संध्याकाळ अधिक वाहतूककोंडी जाणवू लागली आहे. त्यात या मार्गाच्या दुतर्फा असणारी पावसाळी गटारे रुंदीकरणाच्या कामात बुजून गेल्याने रस्त्यावर पावसाच्या पाण्याची तळी तयार झाल्याचे दृश्य होते.
रुंदीकरणाच्या या कामात तीन मार्गिका खुल्या ठेवण्यात आल्या असून दोन मार्गिकांवर काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याकडे जा-ये करणारी उरण फाटय़ाजवळ मोठी वाहतूककोंडी होत असल्याचे दृश्य आहे. पर्यायी मार्ग नसल्याने ही वाहतूककोंडी येत्या काळात होणार असल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका उच्च अभियंत्याने दिली. या महामार्गावरील नवी मुंबई-पनवेल शहरांना जोडणारी सुप्रसिद्ध बेलापूर खिंड सपाट होणार आहे.
या खिंडीत पूर्वी खूप मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने या ठिकाणी आल्यानंतर मुंबईत आल्याची वाहनचालकांना खात्री पटत होती. या खिंडीत अनेक चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे. त्यामुळे या खिंडीचे तिच्या सपाटीकरण व रुंदीकरणामुळे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.

डिसेंबर २०१४ उजाडणार
हे रुंदीकरण व काँक्रिटीकरण मे २०१४ पर्यंत पूर्ण करण्याची अट आहे, पण बांधकाम कंपन्यांना आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी लागलेला विलंब आणि त्यामुळे कामाला सुरुवात करण्यास झालेली दिरंगाई यामुळे हा दहा पदरी रस्ता डिसेंबर २०१४ पर्यंत खुला होईल असे दिसून येते.