भक्ती परब
सरसकट एवढे पैसे द्या आणि आम्ही जे दाखवू ते पाहा, असा खाक्या असणारी एकेकाळची केबलसेवा इतिहासजमा झाली, जेव्हा ‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा’ने (ट्राय) २०१० पासून ‘कंडिशनल अॅक्सेस सिस्टीम’ (कॅस) ही प्रणाली आणायचा निर्णय घेतला. टप्प्याटप्प्याने देशभरात लागू होत गेलेल्या या प्रणालीमुळे खरे म्हणजे त्याचवेळी ज्या वाहिन्या पाहायच्या आहेत त्याच निवडून तेवढय़ाच वाहिन्यांचे पैसे द्यायचा अधिकार ग्राहकांच्या हातात आला असता. मात्र त्यावेळी केबल संघटनांनी कडवा विरोध केल्याने ‘ट्राय’चा हेतू पूर्णपणे साध्य झाला नाही. आता मात्र केबल व्यावसायिकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याबरोबरच वाहिन्यांच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती नियंत्रणात आणून ग्राहकांच्या खिशावरचा भार कमी करण्याच्या हेतूने ट्रायने पुन्हा नवी नियमावली जाहीर केली आहे.
‘ट्राय’चे नवे नियम
ट्रायने प्रत्येक वाहिनीची एमआरपी निश्चित करून ती त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यानुसार कोणत्याही वाहिनीची किंमत ही १९ रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. ग्राहकांना १३० रुपयांमध्ये शंभर फ्री टू एअर एसडी वाहिन्या उपलब्ध असणार आहेत. ग्राहकांना कमीत कमी १३० रुपयांचे हे पॅकेज घ्यावे लागेल. त्याच्यावर एखादीच वाहिनी हवी असेल तर त्या वाहिनीच्या एमआरपी किमतीनुसार आणि सशुल्क वाहिन्यांवर आकारण्यात आलेल्या एकत्रित वस्तू सेवा करानुसार (जीएसटी) तुमच्या दरात वाढ होईल.
एकाच समूहाच्या वाहिन्यांचे पॅकेज घ्यायचे असेल तर संबंधित ‘ब्रॉडकास्टर’ने वाहिन्यांची ठरावीक किमतीतील जी पॅकेज उपलब्ध केली असतील ती ग्राहकाला निवडता येतील. त्यानुसार त्यांच्या दरात वाढ होईल. आधीप्रमाणे केबल व्यावसायिक किंवा टाटा स्काय, डिश टीव्ही यासारख्या सेवाधारकांना वाहिन्यांचे पॅकेज निवडून ते ग्राहकांना दाखवता येणार नाहीत. त्याऐवजी त्यांना त्यांच्या संकेतस्थळावर प्रत्येक वाहिन्यांची एमआरपी किंमत आणि ब्रॉडकास्टर्सनी उपलब्ध करून दिलेले पॅकेज दर ग्राहकांपर्यंत पोहोचवावे लागतील.
ग्राहक एमआरपी किमतीनुसार हवी असलेली एकेक वाहिनी निवडू शकतील. किंवा त्यांना झी समूह, सोनी समूह अशा ‘ब्रॉडकास्टर’च्या विविध वाहिन्या पाहायच्या असतील तर त्यांच्याकडे संबंधित ब्रॉडकास्टरनी दिलेल्या पॅकेजमधून त्यांना हवे ते पॅकेज निवडता येईल.
ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य
टाटा स्काय, डिश टीव्हीसारख्या सेवा देणाऱ्या संस्था किंवा केबल व्यावसायिक यांचे दर एकसारखे नव्हते. त्यामुळे त्या त्या भागातील केबल सेवेनुसार जे दर आकारले जात ते स्वीकारून त्यांत त्यांनी दिलेल्या वाहिन्या ग्राहकांना पाहाव्या लागत होत्या. सगळीकडे वेगवेगळ्या केबल व्यावसायिकांची सेवा असल्यामुळे त्यांच्याही दरात तफावत होती. ग्राहकांना पूर्णपणे त्यांच्या आवडत्या वाहिन्या निवडण्याचे अधिकार नसल्याने या दोघांनी दिलेली पॅकेज आणि त्यांचे दर ग्राहकांना मुकाट स्वीकारावे लागत होते. इथे खुद्द ग्राहकच त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार वाहिन्या निवडून त्याचे स्वत:चे पॅके ज करू शकणार आहेत. त्याच वाहिन्यांचे पैसे आणि १८ टक्के जीएसटी मिळून होणारे शुल्क ग्राहकांकडून आकारले जाणार आहे.
नियमावली कधीपासून?
ट्रायने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार २९ डिसेंबरपासून जुन्या पद्धतीप्रमाणे ग्राहकांना सेवा मिळणार नाही. त्यामुळे शंभर फ्री टु एअर वाहिन्याच ग्राहकांना दिसतील., इतर वाहिन्या दिसणार नाहीत. त्यासाठी सध्या ब्रॉडकास्टर्सनी वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्या वाहिन्यांचे पॅकेजेस, त्यांचे दर यांच्या जाहिराती सुरू केल्या आहेत.
नवीन पॅकेज
नव्या वर्षांत ग्राहकांना आकर्षक भेट अशा आशयाच्या जाहिराती करत विविध वाहिनी समूहांनी आपले पॅके जजाहीर केले आहेत. स्टार समूहाच्या वाहिन्यांच्या एकत्रित पॅकसाठी ४९ रुपये मोजावे लागतील. तर झी समूहाने दूरचित्रवाणी पाहणाऱ्या कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून आपले विविध पॅक आणले आहेत. यामध्ये झीचा हिंदी फॅमिली पॅक (एसडी) ४५ रुपये असून मराठी फॅमिली पॅक (एसडी) ५० रुपये आहे. सोनी समूहाने ‘हॅपी इंडिया पॅक’ या शीर्षकांतर्गत सिल्व्हर, प्लॅटिनम अशी वर्गवारी करत विविध पॅक आणले आहेत. यात सर्वसाधारण पॅकची किंमत ३१ रुपये असून प्लॅटिनम पॅकची ९० रुपये किंमत आकारली आहे. कलर्स समूहाने ‘कलर्सवाला पॅक’असे नाव देऊन एका दिवसासाठी १ रुपया अशी बेरीज करत २० वाहिन्यांसाठी २५ रुपयाच्या पॅकची घोषणा केली आहे.