वाहिन्या निवडीची सेवा देण्यास ‘डीटीएच ऑपरेटर’ आणि ‘एमएसओ’ सरसावले
ग्राहकांना हव्या असलेल्या वाहिन्या निवडण्याचा हक्क मिळवून देणाऱ्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या नियमांनुसार झी, स्टार, कलर्स, सोनी आणि इतर प्रक्षेपण कंपन्यांनी वाहिन्यांच्या किमती आणि पॅक जाहीर केल्यानंतर आता डीटीएच ऑपरेटर, एमएसओंनी (मल्टीपल सिस्टीम ऑपरेटर) आपापल्या पातळीवर या नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हॅथवे, डीश टीव्ही, एअरटेल डिजिटल, सिती नेटवर्क आणि डेन नेटवर्कचा यामध्ये समावेश आहे. ग्राहकांना ‘ट्राय’ने आखून दिलेल्या नियमानुसार सेवा देण्यासाठी या डीटीएच ऑपरेटर, एमएसओनी आपली संकेतस्थळे अद्ययावत केली.
ग्राहकांसाठी वाहिन्यांच्या नव्या किमती संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना निवड करणे सोपे जाईल. हवी ती वाहिनी निवडल्यामुळे मासिक शुल्क कमी होईल, आता प्रक्षेपण कंपन्या आणि ग्राहकांमधील दुवा म्हणूनच डीटीएच ऑपरेटर काम करणार आहे, असेही एअरटेलकडून सांगण्यात आले. डीटीएच ऑपरेटरकडून आता नव्या किमतीनुसार पॅक बनवले जात आहेत. त्यामुळे २०० रुपयापासून ते ५०० रुपयांपर्यंत वेगवेगळे पॅक ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. हॅथवेने महाराष्ट्र, कर्नाटक, उडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम अशा राज्यांनुसार विविध पद्धतीने ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी वाहिन्यांचे सुधारित किमतीनुसार नव्याने पॅकेज बनवले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात त्यांनी सहा पॅकेजेसची किंमत २७० ते ३५० च्या दरम्यान ठेवली आहे. या पॅकेजना आपला चॉईस १, आपला चॉईस २, आपला चॉईस ४, आपला फॅमिली फिक्शन पॅक, आपला फॅमिली स्पोर्ट्स पॅक अशी नावे दिली आहेत. टाटा स्कायने २४ जानेवारीपासून ‘ट्राय’च्या वाहिन्या निवडीच्या नव्या नियमानुसार ग्राहक सेवा देणे मान्य केले आहे. परंतु ‘ट्राय’च्या नव्या नियमांतील काही मुद्यांवर आम्ही सहमत नव्हतो. त्यासंदर्भातील कायदेशीर लढा आमचा अजूनही न्यायालयात सुरू आहे. त्यावरील सुनावणी आता २८ जानेवारीला होणार आहे, असे टाटा स्कायकडून सांगण्यात आले.
आम्ही जबाबदार नाही! ग्राहकांनी निवड केली का, कोणत्या वाहिन्या निवडल्या याबाबत अनभिज्ञ आहोत. ट्रायने नव्या नियमांची अंमलबजावणी पुढे ढकलण्यास नकार दिल्याने १ फेब्रुवारीपासून निवडलेल्या वाहिन्याच पाहाता येतील. मात्र ज्यांनी निवड केलेली नाही त्यांना पसंतीच्या, सशुल्क वाहिन्या पाहता येणार नाहीत. ती जबाबदारी आमची नसेल, असा दावा केबल ऑपरेटर संघटनेने केला.